ऍडम , ईव्ह आणि ऍडम

नाटकाचा परामर्श -

 

मुख्य पात्रं -                  

पुण्यातील एक सुखवस्तू कुटुंब. श्री सौ ( मुद्दाम कोणतंही आडनाव इथे घेतलेलं नाही ) , श्रींची आई अनाथाश्रमाची आजन्म विश्वस्त आणि माजी संचालिका, भिंतीवर तसबिरींमध्ये श्रींचे वडील, आजोबा आणि आजी. नुकताच अमेरिकेहून उच्चशिक्षण घेऊन भारतात परतत असलेला मुलगा आणि त्याच्याबरोबर अचानकपणे ध्यानीमनी नसताना आलेली त्याची मैत्रीण.

 

नेपथ्य  -  

प्रशस्त 'फ्लॅट' चा दिवाणखाना, खुलं स्वयंपाकघर, मुख्य दरवाजा, डाव्या बाजूला गच्चीवर जाण्यासाठीचा 'काचेचा सरकता दरवाजा' , उजव्या बाजूला दोन बेडरूमची आणि एक स्नानगृहाचं दार . काचेच्या दरवाज्यातून बाहेर दिसणारी समोरच्या टोलेजंग इमारतीची आकृती. दिवाणखान्यात आठ व्यक्ती बसू शकतील इतका प्रशस्त 'लाउंजर' सोफा, दोन आरामखुर्च्या, स्वयंपाकघराच्या ओट्याच्या समोर 'ब्रेकफास्ट चेयर्स'. घराच्या भिंतींपैकी एका भिंतीला लालसर 'हायलाईट' रंग, शुभ्र प्रकाश. ठळकपणे दिसणारं पुस्तकांनी भरलेलं कपात, ज्यात महाभारत, मृत्युंजय, युगंधर अशी ऐतिहासिक आणि त्याबरोबरच भारताची राज्यघटना, स्टिव्ह जॉब्सचं चरित्र अशी पुस्तकं.

 

कथावस्तू -

अमेरिकेहून 'बायोमेडिकल इंजिनिअरिंग' मध्ये 'मास्टर्स' करून ओंकार आपल्या घरी आपल्या आई-वडिलांकडे परततो. याच विषयात पुढे डॉक्टरेट करायची मनीषा असल्यामुळे त्याला वर्ष-दोन वर्षात अमेरिकेत परतण्याची इच्छा असते. सोबत त्याच्याबरोबर त्याची मैत्रीण सारा आलेली असते. ही सारा भारतीय वंशाची, ओंकारसारखीच उच्चशिक्षित आणि अमेरिकेत वाढलेली अमेरिकेची नागरिक असते.

 

सुरुवातीला सारा आणि ओंकार यांच्यात 'मैत्रीच्या पुढचं काही' आहे का, याची चाचपणी आई - वडील करतात. त्या दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे हे समजल्यावर इतकी चांगली सून आपल्याला मिळणार या विचारांनी दोघे हरखून जातात. त्यांच्या अति उत्साहातून कुटुंबातल्या जवळच्या नातेवाईकांना ही गोड बातमी समजते.

 

एके क्षणी अचानक साराच्या सामानात ओंकारच्या आईला साराचा एक अल्बम सापडतो. त्या अल्बममधल्या छायाचित्रांमधून तिला समजत, की सारा मुळात एक स्त्री नसून जन्माने पुरुष असलेला 'शंतनू' आहे. या सगळ्याचा धक्का बसून ते कुटुंब मुळापासून हादरून जातं. अचानक या लग्नाला त्यांच्याकडून कडाडून विरोध होतो. ओंकार आणि साराला या सगळ्याचा मनस्ताप होऊन ते आपली बाजू आग्रहाने मांडायचा प्रयत्न करतात.

 

शेवटी घरातला विरोध आणि साराचा पदोनपदी होत असलेला अपमान सहन होऊन ओंकार तिच्याबरोबर घराबाहेर पडायचा निर्णय घेतो, पण अनपेक्षितपणे आजी त्याच्या बाजूने खंबीरपणे उभी राहते आणि त्यांचं लग्न लावून द्यायची जबाबदारी घेऊन त्यांना आशीर्वाद देते.

 

पात्रांच्या व्यक्तिरेखा -

श्री हर्षवर्धन - मोठ्या कंपनीत उच्च पदावर असल्यामुळे सेवानिवृत्त होऊनही घरातले सगळे निर्णय 'स्वतः' घेणारे, घराण्याचा अभिमान बाळगणारे, टॅबलेटवर वर्तमानपत्र वाचण्याइतपत ' टेक - सॅवि '.

 

सौ मंजिरी हर्षवर्धन - पुणे विद्यापीठातून मराठीच्या प्राध्यापिका म्हणून निवृत्त झालेल्या, डोळ्यांवर स्टयलिश काळ्या फ्रेमचा चष्मा लावणाऱ्या, संयत, हळू आवाजात बोलणाऱ्या परंतु वेळप्रसंगी डोळ्यांनी आणि आवाजातल्या तीक्ष्ण सुरांनी समोरच्या व्यक्तीला नाराजी दर्शवणाऱ्या.

 

मालती आजी -  ऐंशीच्या वर वय असलेल्या  हर्षवर्धनच्या आई. मनस्वी, सुनेच्या आणि मुलाच्या त्राग्याला नं जुमानता आपल्या मनाप्रमाणे जगणाऱ्या, मोठा आवाज असल्यामुळे प्रथमदर्शनी 'काटकट्या' वाटू शकणाऱ्या परंतु मायाळू आणि प्रसंग सांभाळून घेणाऱ्या. एका अनाथाश्रमाच्या संचालिका आणि आजन्म विश्वस्त असणाऱ्या मालती आजी घरातला अंतिम शब्द आहेत.

 

ओंकार - सत्तावीस वय असल्यामुळे काहीसा स्वप्नाळू, बेफिकीर परंतु विचारपूर्वक निर्णय घेणारा. अमेरिकेला राहून आल्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट्सचा शौकीन. परदेशात राहूनही भारतीय एकत्रित कुटुंबपद्धतीवर मनापासून श्रद्धा असलेला आणि घरच्या 'मोकळ्या वाटणाऱ्या' वातावरणामुळे घरच्यांशी मित्रासारखा वागणारा.

 

सारा  - अमेरिकेत राहूनही भारतीय संस्कार जपलेली, थोडीशी  पुरुषी अंगकाठी असणारी. अमेरिकन पद्धतीने इंग्रजी आणि तरीही अस्खलित मराठी बोलणारी. खांद्यावर गणपतीचं टॅटू, 'हायलाईट' केलेले खांद्यापर्यंत आलेले केस, शांत पण तरीही ठामपणे व्यक्त होणारी आणि वादविवादापासून लांब जायचा प्रयत्न करणारी.


फेड इन.

 

प्रसंग एक.

 

( प्रशस्त फ्लॅटच्या दिवाणखान्यात सोफ्यावर श्री हर्षवर्धन हातात कॉफी घेऊन टॅब्लेटवर वर्तमानपत्र वाचत बसलेले आहेत. मागे खुल्या स्वयंपाकघरात सौ मंजिरी आपल्या कपातलय गरम पाण्यात ग्रीन टी बॅग बुडवत आहेत. )

 

हर्षवर्धन ( कॉफीचा घुटका घेत घेत ) : मंजू, आजकाल सकाळीच काय काय बातम्या वाचाव्या लागतात बघ...पहिल्या पानापासून अग्रलेखापर्यंत फक्त संघर्ष, दरोडे, खून आणि अनैतिक कृत्य.... एक शहर सुटलेलं नाही यातून...अगदी आपलं पुणं सुद्धा! ( मंजिरीकडे बघत ) आपले अण्णा पुण्यात आले होते, तेव्हा हे शहर म्हणे त्या काळीसुद्धा आधुनिक विचार असलेल्या आणि शिक्षणाची महती पटलेल्या सुधारकांचं शहर म्हणून ओळखलं जायचं....आणि आता हे बघ...( टॅबलेट मंजिरीकडे वळवत ) रेव्ह पार्टीमध्ये ड्रग्ज घेताना कॉलेजची मुलं पकडली गेली...हुंड्यासाठी नवविवाहितेचा छळ अश्या बातम्या चक्क पुणे शहराच्या पुरवणीत ! अण्णा असते तर काय बोलले असते कुणास ठाऊक...

 

मंजिरी ( हळू हळू स्वयंपाकघरातून चालत सोफ्याकडे येत येत ) : अरे पण हे होणारच....जग बदलतंय...आणि पुणं काय जगावेगळं आहे का? म्हणजे तुम्हा खास पुण्याच्या मंडळींना तसं वाटत असेलही, पण तसं नसतं ना रे...( हर्षवर्धन तिच्याकडे बघून हसतो आणि उत्तर द्यायला जातो , आपला कप टेबलवर ठेवत मंजिरी त्याला काही बोलू नं देता पुढे बोलते ) आता हे बघ ना, तुझी कॉफी आणि माझा ग्रीन टी हे पण आपल्या मूळ सवयीत झालेले बदलच आहेत ना...थोडक्यात काय, बदल हाच जगाचा स्थायीभाव आहे , हे सत्य एकदा स्वीकारलं की मग सगळ्या प्रश्नांची उत्तर आपसूक मिळत जातात, काय? 

 

हर्षवर्धन : अगदी बरोबर बोलीस बघ...आता हेच बघ ना, आपल्या काळात साधी मॅट्रिकची परीक्षा पास झाल्यावर घरात दिवाळी साजरी व्हायची....आणि आता? आता डिग्री हातात आली तरी कमी पडते नाही? मला आठवतंय मंजू, मी जेव्हा फर्ग्युसनच्या आवारात पहिल्यांदा पाऊल ठेवलं ना, तेव्हा छाती अशी अभिमानाने फुलून आली होती माझी... बीकॉम, एमकॉम आणि एमबीए अशा पायऱ्या चढत गेलो....सध्या कारकुनाच्या हुद्द्यापासून सुरुवात करून कंपनीचा सीएफओ होण्यापर्यंत मजल मारली...सगळं कसं अजून डोळ्यासमोर स्पष्ट दिसतं ! अर्थात आजच्या पिढीला एकाच कंपनीमध्ये तीस वर्ष नोकरी हे जरी विचित्र वाटत असलं, तरी माझ्यासाठी माझ्या कंपनीत मी काढलेली ती तीस वर्षं माझ्या आयुष्याचाच एक अविभाज्य भाग होती आणि राहतील...... पण आजकाल अशी 'इमोशनल अटॅचमेंट' दिसत नाही या नव्या पिढीत....( हसत हसत ) बदल, नाही का?

 

मंजिरी : अगदी बरोब्बर बोललास....( हर्षवर्धनकडे बघत ) पण एक सांगू हर्ष? अण्णा आणि माईची कमाल आहे ना रे? ज्या काळात मुलाने बीकॉम झाल्या झाल्या एखाद्या सरकारी नोकरीला चिकटून कमावतं व्हायचं आणि घराची जबाबदारी अंगावर घ्यायची असा संकुचित दृष्टिकोन दहापैकी नऊ जणांचा होता, त्या काळात अण्णांनी तुम्हा दोघा भावंडांना किती शिकवलं नाही? अण्णा आणि माईची त्या बाबतीत मला कमाल वाटते...मलासुद्धा लग्नानंतर एमए आणि डॉक्टरेट करायला त्यांनीच प्रोत्साहन दिलं...आठवतंय?


हर्षवर्धन ( मान डोलावत ) : अगदी बरोबर…..अण्णांनी खस्ता खाल्ल्या पण मला आणि शीला ताईला भरपूर शिकू दिलं. अण्णा आणि माई - दोघेही त्या बाबतीत समान आग्रही होते...शीला ताईला तर एम.. झाल्याशिवाय लग्नाचा विषय सुद्धा काढू नकोस हे त्या काळात त्या दोघांनी सांगितलं होतं.... अगदी आमच्या नातेवाईकांच्या विरोधाला जुमानता!

 

मंजिरी : शक्य असत तर त्यांनी तुला परदेशात सुद्धा पाठवलं असतं, यात मला यत्किंचितही शंका नाही वाटत. म्हणून सांगते, आपल्याकडून नाही, पण ओंकारकडून तरी त्यांचं ते स्वप्न पूर्ण झालं याचं मला बरं वाटतं... त्यात ओंकार म्हणजे काय....लहानपणापासून उच्चशिक्षणाच्या बाबतीत इतकी स्पष्ट मतं असलेला मुलगा माझ्या तरी पाहण्यात अजूनपर्यंत आलेला नाही...  

 

हर्षवर्धन : हो ना...आणि आठवतंय का इंजिनीरिंग झाल्यावर कसा आपल्यासमोर उभा राहून बोलत होता? ( ओंकारच्या हावभावाची आणि देहबोलीची नक्कल करत ) डॅड, अमेरिकेत जाऊन दोन वर्षं मास्टर्स करेनच, पण पुढे डॉक्टरेट करायची आत्तापासूनच तयारी करणार आहे मी...I hope you dont mind ....( हसत हसत ) ही पिढी खूप फास्ट आहे मंजू...यांना खूप कमी वयात अँबिशन्स समजायला लागतात... स्वतःच्या अस्तित्वाबद्दल ही पिढी आपल्यापेक्षा कैक पटींनी जास्त जागरूक आहे...काय?

 

मंजिरी : हो नक्कीच...ओंकारची अभ्यासातली गती बघून मला सुद्धा  अण्णा नेहेमी सांगायचे ...सूनबाई, पोराला काहीही झालं तरी परदेशात शिकायला पाठव....काळाच्या खूप पुढचा विचार करायचे ते...आणि माईसुद्धा....ओंकारनंतर आपण दुसरं मूल होऊ नं द्यायचा निर्णय घेतला तेव्हासुद्धा माई माझ्या बाजूने खंबीरपणे उभी होती आठवतंय का? तिने तेव्हा साथ दिली नसती तर माझं डॉक्टरेट मला पूर्ण करता आलं नसतं कदाचित !

 

( दाराची बेल वाजते आणि दोघांच्या गप्पांचा ओघ एकदम थांबतो.... मंजिरी दार उघडते. मीना लगबगीने आत येते )

 

मीना ( चप्पल काढत भरभर बोलायला लागते ) : ताई, माफ करा जरा उशीर झाला आज....मुन्शिपाल्टीची पान्याची लाईन फुटली रातच्याला…, त्यामुळे घरात नळाला पानीच न्हाई आलं सकाळच्याला....आनी त्यात आमचं हे रात्रपाळी करून आलं आणि ( हातवारे करून ) झोपून गेलं...लई येळ गेला बघा उरकन्यात...

 

( मंजिरी मीनाला थांबवते. )

 

मंजिरी : कळलं...श्वास घे आधी....मी काही बोलले का तुला? शांत हो.... बरं  खाल्लयस का सकाळी काही? हवं तर तिथे त्या भांड्यात उपमा आहे, तो खा आधी...मग कामाला लाग...

 

मीना ( मान डोलवत ) : चालेल...पण ताई, तुम्ही मुंबईला जाणार होता ना ? आपला ओंकार बाबा आजच येणार आहे ना? न्हाई म्हंजी साडेनऊ वाजलं...

 

( हर्षवर्धन हसत हसत सोफ्यावरून उठतो, घड्याळाकडे बघतो आणि बेडरूमच्या दाराच्या दिशेने जायला लागतो )

 

हर्षवर्धन : अगं मंजू बोलत काय बसलोय आपण...चार-साडेचार तासात ओंकारचं फ्लाईट लँड होईल तिथे मुंबईला... एक तर आधीच delay  झालाय फ्लाईटला त्यामुळे चिरंजीव कावलेलेच असणार एव्हाना...निघायला हवं लवकरात लवकर...दोन वर्षांनी चिरंजीव भेटतायत...वेळेवर पोचलो नाही एअरपोर्टवर तर उगीच चिडचिड होईल त्याची.... का कुणास ठाऊक, आग्रह करून सांगत होता त्या दिवशी फोनवर, की काहीही झालं तरी तुम्ही आणि मॉम एअरपोर्टवर या म्हणजे या....बाकीच्या कोणाला आणायलासुद्धा मना करत होता...काय डोक्यात आहे कोण जाणे साहेबांच्या....

 

मंजिरी ( हसत हसत ) : तुम्ही तरी कुठे थांगपत्ता लागू देता तुमच्या मनात काय शिजतंय त्याचा?  त्या बाबतीत अण्णांचा वारसा तुम्ही बापलेक अगदी समर्थपणे पुढे नेताय....समोरच्याचा जीव टांगणीला लावायचा आणि 'योग्य वेळ' आली की खुलासे करायचे....आता कळलं आम्हाला कसं वाटत असेल  ते? ( हसत हसत केस ठाकठीक करते. )

 

( हर्षवर्धन कपडे बदलून येतो, बूट घालतो, मंजिरी खांद्याला पर्स लटकवते, चप्पल घालते आणि गाडीची किल्ली घेते.)

 

मंजिरी: मी ड्राइव्ह करते... तू नको. ( हर्षवर्धन काही बोलणार इतक्यात हाताने खूण करत ) मी काहीही ऐकणार नाही....तू खूप वेगाने गाडी चालवतोस, मला आज तरी जीव मुठीत धरून गाडीत बसायचं नाहीये....

 

हर्षवर्धन ( नाटकीपणे ) : जशी आपली आज्ञा !

 

( आतून घरकाम करणारी मीना बाहेर येते )

 

मीना: ताई, आजींना जेवणाच्या आधीच्या गोळ्या देईन मी....नगा काळजी करू...आणि ओंकार बाबांची खोली पण नीट लावून ठेवते तुम्ही यायच्या आधी...

 

मंजिरी: नीट बघ सगळं, आम्ही येऊ संध्याकाळपर्यंत...... दुपारचं सगळं जेवण करून ठेवलंय ओट्यावर...आणि हो, माईला लोणचं जास्त वाढू नकोस, अगदी त्यांनी त्रागा केला तरी.......आणि रात्रीच्या जेवणाची तयारी करू नकोस,, आज बाहेरूनच मागवायचं आहे...चल येतो आम्ही...... लक्ष ठेव घराकडे.

 

( मंजिरी आणि हर्षवर्धन घराबाहेर पडतात. आतून मालती आजी काठी टेकत संथ पावलं टाकत येते )

 

आजी ( हसत हसत ) : काय ती घाई लागलीय पोराला बघायची...मीने, बघितलंस का ? ही आमची सूनबाई एरव्ही हॉटेलचं नाव काढलं की डोळे वटारते....आज बघ, स्वतःहून कशी बोलली …..( मंजिरीच्या बोलण्याचा अभिनय करत ) संध्याकाळी बाहेरून मागवूया... ( पुन्हा हसते आणि मीनाकडे हातावर टाळी मागते..) आज बरेच दिवसांनी मस्त मजा येणार जेवायला काय?

 

मीना ( टाळी देता देता ) : आज्जी, पन तुमाला जास्त न्हाई खाऊ देनार त्या.... मागल्या टायमाला हट्ट करून दोन गुलाबजाम जास्त खाल्ले तुम्ही तवाचं आठवतंय ना? तुमची साखर आनी साहेबांचा पारा यकदम टॉपला....( खदखदून हसते )

 

आजी ( नाटकीपणे मीनाकडे बघत मोठ्या आवाजात ) : मला म्हातारीला छळा तुम्ही सगळे असेच...... इतकी पथ्य पाळून जगण्यात काय अर्थ आहे? खाऊन पिऊन मेले तर मुक्ती तरी मिळेल माझ्या आत्म्याला...... नाहीतर सरळ माझ्या आश्रमात निघून जाते कशी मी....तिथे कोणाची बिशाद नाहीये मला नाही म्हणायची....

 

मीना: राहिलं..... माझ्यावर का राग काढता? मी आपली तुमच्या काळजीपोटी बोलले...बरं त्ये सोडा,….चला आता, तुमचं न्हायचं पानी काढते...... तुमचे केस सुकवायला पण लै टाइम लागतो...... तुम्ही न्हायला गेला की खाऊन घेईन मी...

 

मालती आजी : म्हणजे? उपाशी आहेस अजून? माझ्या आंघोळीचं नंतर बघू. आधी जा आणि चार घास खाऊन घे....मंजिरीने उपमा केलेला होता सकाळी तो असेल बघ...आणि त्या पातेल्यातलं कपभर दूध घे...जा लगेच...( मीनाला ढकलत ) जा म्हणते ना...

 

मीना ( मालती आजीचा हात धरत ) : अवं खाईन मी...पाच मिनिट लागतील पानी काढायला तुमचं...तेवढ्याने काय हुतंय? चला आत...नगा काळजी करू........सकाळच्याला चा आणि पाव ढकललाय पोटात तवा अगदीच उपाशी न्हाई मी....चला बघू तुम्ही आत....

 

( दोघी खोलीत जातात. )

 

फेड आऊट.

 

 

 

 

प्रसंग दोन:

 

( बाहेरून हर्षवर्धन, मंजिरी, ओंकार आणि एक अनोळखी मुलगी घरात प्रवेश करतात )

 

हर्षवर्धन : मीना, आहेस का? जरा सामानाच्या बॅगा घे...आणि त्याआधी जरा पाणी आण....तुझा ओंकार बाबा आलाय बघ...

 

( सगळे जण बूट काढून आत येत सोफ्यावर बसतात, आलेली अनोळखी मुलगी घर न्याहाळत असते, त्यामुळे बूट नं काढताच आत येते आणि ओंकारच्या बाजूला बसते. ओंकार तिला खुणेने बूट काढून ठेवायला सांगतो. ती गोंधळते. )

 

ओंकार ( हळू आवाजात पुटपुटत ):  सारा, इथे भारतात बूट चपला घरात घालून नाही येत...प्लीज बूट काढशील?

 

( सारा भांबावलेल्या नजरेने सगळ्यांकडे बघते, ओशाळून बूट काढते आणि दाराजवळ ठेवून पुन्हा येऊन बसते...इतक्यात मीना आतून घाईघाईत स्वयंपाकघरात जाते आणि तीन ग्लासात भरून पाणी घेऊन येते. ओंकारकडे बघून ती हसते आणि तिची नजर साराकडे जाते )

 

मीना ( साराकडे कुतूहलाने बघत मोठ्याने ) : अवं या कोन?

 

मंजिरी ( धारदार आवाज लावत ) : मीना.....

 

मीना ( स्वतःला सावरत ) : न्हाई मंजी...आजून एक ग्लास पानी आनते.....

 

( चटकन तिथून पुन्हा स्वयंपाकघराकडे जाते आणि एक अजून ग्लास भरून आणते. तो ग्लास साराच्या हातात देऊन तिच्याकडे बघत बघत आजीच्या खोलीकडे जायला लागते..)

 

ओंकार : ममा, माई कुठे आहे? कशी आहे? अजून गुढघे दुखतात की आता आराम पडलाय? आणि आश्रम कसा चाललाय तिचा? जाते अजून ?

 

मंजिरी : ठीक आहे...वयपरत्वे काही गोष्टी आता स्वीकाराव्या लागणारच...पण पंच्याऐंशी वय असूनही बुद्धी आणि जीभ तल्लख आहे अजून...दिसेलच तुला... आणि हो, अजून आश्रमात जाते  अधून मधून...डोळ्यात तेल घालून लक्ष असतं तिथे काय चाललंय काय नाही त्यावर... आपल्या अण्णांनी सुरु केलेलं हे व्रत अजूनही ती जातीने संभाळतेय...कमाल आहे ना?

ओंकार : अगदी....( साराकडे बघत ) माई म्हणजे माझी मॅटर्नल ग्रॅनी....आणि अण्णा म्हणजे माझे मॅटर्नल ग्रँडपा...( भिंतीवरच्या तसबिरीकडे बोट दाखवत ) ते बघ, ते पहिल्या फोटोत आहेत ना, ते. त्यांनी खूप वर्षांपूर्वी आश्रम सुरु केला होता पुण्याच्या औटस्कर्ट्सला...अनाथ मुलं, बायका, पुरुष, ओल्ड एज झालेले लोक...... ( एक सेकंद थांबून ) युनक्स , ट्रान्सजेण्डर्स....अशा सगळ्यांना मुख्य प्रवाहात...आई मीन ' मेन स्ट्रीममध्ये ' आणायचं काम होतं तिथे...माई स्वतः जातीने लक्ष घालते सगळ्यात....not an ordinary work by any means, isn’t it?

 

मंजिरी ( ओंकारला शांत करत ) : ओम, माई आली....जरा थांब आता....आपण बोलूया नंतर सविस्तर....

 

( आतून आजी मीनाच्या आणि काठीच्या आधाराने हळू हळू बाहेर येते. समोर ओंकारच्या बाजूला बसलेली सारा बघून एक सेकंद थबकते आणि आपल्या आरामखुर्चीकडे जाते. हळू हळू खुर्चीवर बसल्यावर ती हसते आणि हात वर करून ओंकारला जवळ बोलावते )

 

मालती आजी ( मोठ्या आवाजात ) : ये बाळा, कसा आहेस? आणि तिथे अमेरिकेत ' सुटला ' असशील असं वाटलेलं....' सुकला ' असशील असं नव्हतं वाटलेलं...आता पुन्हा दूधतूप खाऊन बाळसं धर लवकर...( हसत हसत जवळ आलेल्या ओंकारच्या डोक्यावरून हात फिरवत ) आणि पाया पडायचे संस्कार विमानात विसरून आलास की काय...( पुन्हा हसते )

 

( ओंकार पाया पडतो आणि आजीच्या पायाशी बसतो. मालती आजी त्याच्या गालावरून हात फिरवत त्याला जवळ घेते आणि कानात पुटपुटते )

 

मालती आजी ( खवचट सुरात ) : ते बरोबर कोण आलंय रे तपकिरी केसाचं ? अमेरिकेत शिकायला गेला होतास ना ? बरं, ते जाऊदे.... पळवून तर नाही ना आणलीयस?

 

( ओंकार चपापतो. आजीकडे बघतो आणि आजी हसल्यावर स्वतः पण हसतो...)

 

ओंकार : आजी, ती माझी मैत्रीण. सारा नाव आहे तिचं. मूळची भारतीय आहे पण आता अमेरिकेत दोन पिढ्यांपासून राहत असल्यामुळे तिथलीच झालीय...पण मराठी खूप छान बोलते...तुला वाटणार नाही अमेरिकेची आहे म्हणून...आणि मला येणार नाही इतकी सुरेख अथर्वशीर्ष म्हणते...माझ्या कॉलेजमध्ये माझ्या वर्गात होती...तिला भारतात यायचंच होतं....मी म्हंटलं चल नं...माझ्या घरी राहा...म्हणजे सगळ्यांशी ओळख होईल....( चाचरत चाचरत )  नाही म्हणजे तिची सुद्धा आणि.... तुमची सुद्धा.... एकमेकांशी ओळख होईल....

 

हर्षवर्धन ( घसा खाकरत  ओंकारच बोलणं तोडून ) : माई, अगं काय आहे, ती याआधी आलेलीच नाहीये ना इथे...आपल्याबरोबर राहील...उगीच कशाला हॉटेलमध्ये राहायचं...नाही म्हणजे एअरपोर्टवर ओंकार बोलला की पुण्याच्या एखाद्या हॉटेलमध्ये ती राहील...पण मीच म्हंटलं...कशाला ना? आपलं इतकं मोठं घर आहेच...शिवाय अनोळखी शहरात एकटी मुलगी...आणि सध्या पुण्यातही नाही नाही ते होताना दिसतंच आहे.....सकाळीच मी मंजूला सांगत होतो की आता शहर तितकंसं सुरक्षित नाही वाटत......

 

मालती आजी ( हात वर करून हर्षवर्धनला थांबवत उंच आवाजात ) : हर्ष, नक्की काय प्रकार आहे स्पष्ट सांगाल? इकडचं तिकडचं बोलताय तुम्ही सगळे पण मूळ मुद्द्यावर येत नाही आहात... ( हर्ष आणि ओंकार नजर चोरून दुसरीकडे बघतात. मालती आजी मंजिरीकडे बघते तेव्हा नेमकी मंजिरीची नजर मालती आजीकडे जाते ) मंजिरी, तू सांग काय प्रकार आहे हा? कोण आहे ही मुलगी आणि तुम्ही सगळे इतकी लंबावळ कशाबद्दल लावताय....

 

( मंजिरी हर्षवर्धनकडे आणि साराकडे बघते, उठून मालती आजीच्या बाजूच्या खुर्चीवर येऊन बसते आणि आपल्या हळू पण स्पष्ट आवाजात सांगायला सुरुवात करते )

 

मंजिरी : माई, उगाच ताकाला जाऊन भांडं लपवण्यात अर्थ नाही...मी स्पष्टच सांगते तुम्हाला. ही सारा. आपल्या ओंकारच्या बरोबर आहे अमेरिकेला...दोघे एकाच वर्गात शिकतात...आमची सुद्धा एअरपोर्टवर ओंकारने ओळख करून दिली...... हेच ते सरप्राईझ ज्यासाठी ओंकारने या वेळी एअरपोर्टवर फक्त मला आणि हर्षनाच बोलावलं होतं...

 

मालती आजी :  मंजिरी, हर्षवर्धन आणि ओंकार - कळलं. सरप्राईझ काय? येतंय माझ्या ध्यानात... ( ओंकारकडे बघत ) ओंकार, मी विचारते त्याच आढेवेढे नं घेता स्पष्ट उत्तर देशील अशी अपेक्षा करते तुझ्याकडून....... विचारू माझा प्रश्न?

 

ओंकार ( स्तब्ध उभा राहून ) : हो माई...विचार.

 

मालती आजी :  ही मुलगी आपल्या घरात नक्की कोण म्हणून आणलीयस तू? बरोबर शिकणारी मैत्रीण, पुणं बघायला आलेली पर्यटक की तुझ्या आयुष्यातली कोणीतरी खास महत्वाची व्यक्ती?

 

ओंकार ( दोन सेकंद थांबतो, माईजवळ जातो. माईचा हात हातात घेतो आणि बोलायला सुरुवात करतो ) : माई, सांगतो. ही माझी फक्त मैत्रीण नाहीये...आम्ही एकमेकांबद्दल.... सिरीयस आहोत...म्हणजे...... अगदी खरं सांगायचं तर....आमचं प्रेम आहे एकमेकांवर....अनेकदा वाटलेलं होतं की आपण ऑनलाईन बोलतो तेव्हा तिच्याबद्दल तुम्हाला सांगावं पण मग विचार केला प्रत्यक्षात भेट घडवून देणं जास्त योग्य ठरेल.... म्हणून मग या वेळी येताना आग्रहाने तिला बरोबर घेऊन आलोय...सगळ्यांशी तिची गाठभेट घालून द्यायच्या उद्देशाने...

( मालती आजी खुणेने त्याला शांत करते.)

 

मालती आजी ( साराकडे बघत ) : इथे ये गं....जरा बाजूला बस माझ्या...

 

( सारा बिचकत बिचकत उठून उभी राहते आणि ओंकारच्या बाजूला जमिनीवर बसते, मालती आजी खुर्चीवर सरळ होऊन तिच्या डोक्यावर हात ठेवते, केसांमधल्या रंगवलेल्या बटा हातात घेऊन हसून सोडते. ओंकारकडे बघते आणि पुन्हा साराकडे बघते.)

मालती आजी :  मराठी बोलतेस ना?

सारा : हो....मी मराठीच आहे...( एकदम अमेरिकन इंग्रजीत ) my grandparents moved to the US long back  ( आपली चूक लक्षात येऊन ओशाळत ) म्हणजे...माझे आजी आजोबा अनेक वर्षांपूर्वी अमेरिकेत स्थायिक झाल्यामुळे मी तिथेच जन्माला आले आणि वाढले......पण मी मराठीच आहे...... माझे मॉम डॅड पण मराठीच होते....

 

मालती आजी ( हाताने शांत राहायची खूण करत ): होते?  समजलं. बरं ते जाऊदे...मी मूळ मुद्द्यावर येते…..आता मला खरं खरं उत्तर दे. ओंकार तुला आवडतो? तुम्ही पूर्ण विचार करून एकमेकांना आयुष्यभर साथ देण्याचा निर्णय घेतलाय?

( सारा थेट प्रश्नामुळे चपापते. उत्तर द्यायच्या ऐवजी ती ओंकारकडे बघते. ओंकार तिचा हात धरून आजीकडे बघतो आणि उत्तर देतो)

ओंकार ( ठाम आणि स्पष्ट सुरात ) : माई, तू म्हणतेस ते खरं आहे. आम्ही लहान आहोत पण विश्वास ठेव, हा निर्णय आम्ही पूर्ण विचार करून घेतलेला आहे आणि म्हणून मी तिला तुमच्या सगळ्यांची भेट घडवून आणायला बरोबर आणलं आहे...

 

मालती आजी ( किंचित चढ्या आवाजात )  : ओंकार, मी तुला प्रश्न केलेला नाही. सारा, मला उत्तर तुझ्या तोंडून ऐकायचंय....या घरात कोणालाही आपलं म्हणणं मांडायला दुसऱ्याची मदत घ्यावी लागत नाही....मला तुझ्याकडूनच उत्तर अपेक्षित आहे आणि ते सुद्धा काहीही संकोच नं करता...

 

सारा : माई, ओंकार जे काही म्हणाला ते खरं आहे....its mutual ....म्हणजे...आम्ही US मध्ये वर्षभर एकत्र राहिलो आहोत...लिव्ह-इन मध्ये...एकमेकांना व्यवस्थित समजून घ्यायला...आंम्ही खूप वेळ घेतलाय ही relationship explore करायला....आणि म्हणून आम्ही हे नक्की सांगू शकतो की आम्ही एकमेकांबद्दल सिरिअस आहोत....sure आहोत...( ओंकारकडे बघते आणि हलकं स्मितहास्य करते )

 

मालती आजी ( साराकडे बघतच रागाच्या सुरात ) : ओंकार, हे सगळं मला अपेक्षित नव्हतं. आधी फक्त आई-बापाला एअरपोर्टवर बोलवून घेऊन त्यांना आपल्या बाजूने करून घायचा विचार आवडला मला, पण तुला माहित आहे हि माई काय आहे ते... ( ओंकारकडे बघते ) तुम्ही सगळे एका बाजूला असलात तरी माझ्या मनाला आणि माझ्या सद्सद्विवेकबुद्धीला जोवर पटत नाही तोवर मी कोणत्याही गोष्टीला होकार देत नाही ( नाही वर जोर ) . एका वर्षात तुम्ही एकमेकांना इतके चांगले ओळखायला लागला आहात? ओंकार, भले तू शिकायला परदेशात गेला असशील...( साराकडे बघत ) तुम्ही दोघे तिथे लिव्ह-इन मध्ये राहिला असाल....पण नातेसंबंधांचा खेळखंडोबा या घरात खपवून घेतला जाणार नाही...मी आहे तोवर तर नाहीच, पण मी गेल्यावर सुद्धा....( हर्षकडे बघत ) काय? बरोबर नं?

 

हर्ष ( मंजिरीकडे बघत ) : अं....होय माई...

 

ओंकार ( आर्जवी पण ठाम सुरात ) : माई, तुझा राग मी समजू शकतो...कदाचित तू तुझ्या नातसुनेची जशी प्रतिमा स्वतःच्या मनात तयार केली असशील तशी सारा नसेलही....पण माझ्यावर विश्वास ठेव...तुझ्या नातवासाठी साराइतकी सुयोग्य व्यक्ती तुला शोधून सापडणार नाही... जर तुला असं वाटत असेल की आज प्रेमाच्या आणाभाका घेणारे आम्ही दोघे काही वर्षांनी वेगवेगळ्या दिशेला जाऊ...वकिलाच्या पायऱ्या चढून घटस्फोटाचे खटले लढू...तर मी तुला एक गोष्ट आज शपथेवर सांगतो...माई, तुझा नातू हे सगळं कधीही होऊ देणार नाही. मुळात आमचं नातं एका अशा भक्कम पायावर उभं राहिलेलं आहे, की त्यात दुभंग येणं शक्यच नाही....नंतर तुम्हाला सविस्तर सांगेन त्याबद्दलसुद्धा, पण आमच्यावर विश्वास ठेव, आम्ही दोघेही या नात्याबद्दल पूर्णपणे निःशंक आहोत.

 

सारा ( माईकडे बघत ) : माई, मला माहित आहे डिवोर्स, सेपरेशन अशा गोष्टी US ला खूप जास्त आहेत...तिथे रिलेशनशिप म्हणजे एक अग्रीमेंट असतं दोन लोकांमधलं....पण मला ते सगळं आवडत नाही. माझ्यासाठी भावनिक नातं जास्त महत्वाचं आहे...मला मॉम-डॅड नाहीत...माझ्या लाईफमध्ये आजवर आली ती फक्त प्रॅक्टिकल रिलेशन्स....मला ओंकार भेटायच्या आधी रिलेशनमधली warmth अनुभवायला मिळालेलीच नव्हती...तुम्हाला नाही माहित की त्याने माझ्यासाठी काय केलंय....आतून मी पूर्णपणे तुटून गेले होते...ओंकार माझ्या लाईफमध्ये आला नसता तर कदाचित मी आज severe depression मध्ये गेलेले दिसले असते....

 

मालती आजी (साराला  थांबवत ) : थांब....शांत हो....आणि हे सुद्धा ऐकून घे माझ्याकडून, मनाने आणि मानाने खंबीर राहते ती स्त्री....ही असली भाषा मला आवडत नाही.

 

सारा : सॉरी....पण मी तेच सांगितलं जे घडलेलं आहे....

 

मालती आजी : ठीक आहे....पण यापुढे तू कधीही ही भाषा करायची नाहीस. ( ओंकारकडे बघत ) ओंकार, मला या गोष्टीचा अभिमान वाटतो की तू एका मुलीला आधार दिलासा आणि तिला तिच्या आयुष्याच्या वाईट अनुभवांमधून सावरायला मदत केलीस...हर्ष...मंजू...( दोघे माईकडे बघतात ) तुम्हाला काय वाटतं?

 

मंजिरी : हो ना माई....म्हणजे ओंकार काही इतका मोठा नाहीये...तसा लहान आहे...पण साराला आधार देऊन त्याने तिला तिच्या मानसिक स्थितीतून बाहेर काढलं हे माझ्यासाठी अभिमानास्पद आहे...हर्ष आणि मी तेच बोलत होतो येताना.....

 

मालती आजी : ते नव्हे....मी या दोघांच्या नात्याबद्दल तुमचं मत विचारते आहे...

 

हर्ष ( एकदम बोलायला सुरुवात करत ) : माई, मी या बाबतीत पूर्णपणे ओंकारच्या बाजूने आहे...इतकी सुरेख, उच्चशिक्षित, आपल्या घराला शोभेल अशी आणि मुख्य म्हणजे अमेरिकन असली तरी अस्सल भारतीय मुलगी मला तरी शोधून सापडली नसती सून म्हणून....

 

मालती आजी ( हर्षकडे रोखून बघत ) : मुंबई ते पुणे इतक्या प्रवासात तू साराला इतकं नीट ओळखलंयस? नाही म्हणजे, साधा टीवी किंवा मोबाईल घेताना दहा दुकानं आणि शंभर पर्याय निवडणार तू आज अचानक...इतकी खात्री देतोयस या मुलीची?

 

हर्ष ( चपापून ) : नाही माई, तसं नाही...अगं सारा म्हणजे काय वस्तू आहे का? माणसं ओळखतो मी नीट...शिवाय मंजिरीसुद्धा तेच म्हणतेय जे मी म्हणतोय...काय ?

 

मंजिरीने ( हर्षकडे बघत ) : हो...हो....हो ना....( माईने रोखून बघितल्यावर शांत होते )

 

मालती आजी : हर्ष, मंजू आणि ओंकार, तुमचे निर्णय काहीही असले तरी मी माझ्या अनुभवांच्या आणि विवेकबुद्धीच्या कसोट्यांवर माझे निर्णय घेत असते हे तुम्हाला माहित आहे. मी मुलगी काय आहे, कोण आहे आणि कशी आहे, हे मला तरी इतक्या कमी वेळात समजून घेणं अवघड आहे. पण माझ्या अनुभवाच्या जोरावर मी इतकं नक्की सांगेन की...( साराकडे बघत ) मगाशी ही मुलगी जे बोलली, त्यात खरेपणा होता. माझ्या नजरेला नजर मिळवून तिने ओंकारबद्दल जे सांगितलं, ते तोंडदेखलं असणं शक्य नाही....

 

ओंकार, सारा, तुम्ही आज मला कितीही खात्री द्याल, पण आयुष्यात कसोटीचे अनेक प्रसंग येतात. आजची पिढी पूर्वीइतकी धीराने त्या प्रसंगांना सामोरी जात नाही, हे मी स्वानुभवावरून सांगते. एकमेकांशी बोलून सामोपचाराने प्रश्न सोडवायची सवय तुमच्या पिढीला नाही...पण मला तुमच्याकडून एक खात्रीशीर वाचन हवाय, की काहीही झालं तरी तुम्ही आयुष्यभर एकत्र राहाल...देऊ शकाल मला हे वचन?

 

( ओंकार आणि सारा एकमेकांकडे बघतात. मालती आजीकडे बघतात आणि मान डोलावतात )

 

मालती आजी : हर्ष, मला आपल्या शंकरला फोन लावून दे जरा....

 

हर्षवर्धन ( गोंधळून ) : हं देतो पण शंकरला आत्ता फोन? त्याच्या दुकानातून आत्ता काय हवंय तुला?

 

मालती आजी ( चेहेऱ्यावर हसू आणत ) : चांगली बातमी समजल्यावर आपण आईस्क्रीमने तोंड गोड करून बातमी साजरी करतो ना हर्ष? विसरलास?

 

( सगळे जण आनंदाने हसायला लागतात. सारा आणि ओंकार मालती आजीला मिठी मारतात. मंजिरी ओढणीने डोळे टिपते. )

 

मंजिरी ( लगबगीने स्वयंपाकघराकडे जात ) : देवापुढे साखर ठेवते.....आणि हो माई, उद्या साराला आणि ओंकारला सकाळीच गणपतीच्या दर्शनाला घेऊन जाते....शिवाय सगळ्यांना कळवते फोन करून आमच्याकडे आनंदाची बातमी आहे ते....

 

हर्षवर्धन ( हसत हसत ) : माई, पूर्वी काय नाटकात काम केलंयस का? काय अभिनय तो...आमचे प्राण कंठाशी आले होते...मला वाटलं आता घरात कसले कसले तंटे होणार आहेत कुणास ठाऊक....आणि काय बेअरिंग घेतलेलंस चिडल्याचं? मी मनातल्या मनात अक्खी रामरक्षा बोलून घेतली इतक्या वेळात आणि भीमरूपी महारुद्राला सुरुवात करणारच होतो....

 

मालती आजी ( आपल्या मूळच्या खणखणीत आवाजात ) : पण एक अट आहे...आज रात्री हॉटेलमधून माझ्यासाठी खास चायनीज मागवायचं माझ्या आवडीचं.  तुझ्या बायकोला सांग, आज मी काही ऐकणार नाही...माझ्या अभिनयाचं पारितोषिक समजा की आपल्या घरात आलेल्या या नव्या सदस्यांच्या आगमनाच्या निमित्ताने माझी तब्येत ठणठणीत झाली म्हणून समजा....आता काहीही खाल्लं - प्यायलं तरी मी काही इतक्या लवकर जायची नाही...उलट माझ्या नातसुनेबरोबर अमेरिकेला जाऊन येईन म्हणते मी आता...काय?

 

( काठीला धरून जोर लावत मालती आजी स्वतःच उठते आणि सारा - ओंकारला उभं राहायची खूण करते )

 

मालती आजी : तुमच्याकडे बघितल्या बघितल्या मला अंदाज आलेला होता पोरांनो...आम्ही पण कधी काळी रोम्यांटिक होतो बरं का...तेव्हाच्या काळी लग्न ठरल्यावर ह्यांच्याबरोबर लग्न व्हायच्या आधी चोरून बालगंधर्वांची नाटकं पहिली आहेत मी...आणि त्यांच्या पद्धतीच्या फ्याशनची साडी नेसून थेट्राबाहेर फोटो सुद्धा काढलेला बरं का...( पदर तोंडावर लावून मालती आजी खुद्कन हसते)

 

ओंकार: माई, साराला आपण लग्नात तशीच साडी नेसवुया का? काय सारा, चालेल का?

 

( सारा गोंधळते )

 

मालती आजी : अरे तिला मुळात बालगंधर्व कोण ते सांग आधी....ऐक गं मुली, तुमच्या अमेरिकेचा तो चार्लि चॅप्लिन होता ना, तसे आमच्या महाराष्ट्राचे होते बालगंधर्व. फार पूर्वी म्हणजे मी तुझ्या वयाची असताना इथे पुरुषाचं स्त्री भूमिका करत असत...तेव्हा खरी स्त्री तोंडात बोट घालील अशी चोख स्त्री भूमिका करायची हे बालगंधर्व...जणू काही अप्सराच...आमच्या काळी त्यांच्या कपड्यांची, दागिन्यांची 'श्टाईल' होती बरं का.......

 

सारा : OK .. how  interesting .... पुरुष असूनही स्त्री भूमिका...आणि ती पण इतकी हुबेहूब की त्यांच्या स्टाईलची अजून तुम्हाला आठवण येते...मला अजून ऐकायला आवडेल त्यांच्याबद्दल...

 

( ओंकार साराच्या खांद्यावर हात ठेवून तिला थांबवतो.सारा एकदम भानावर आल्यासारखी चपापते आणि गप्प होते. मालती आजीच्या नजरेतून ते सुटत नाही.)

 

मालती आजी : काय गं...काय झालं? आत्तापासूनच ओंकारला इतकं घाबरलीस तर कसं चालेल? आणि काय रे, तिच्यावर  कसली दादागिरी करतोस? पोर नवी आहे, नव्या देशात नव्या घरात आलेली आहे म्हणून असा वागशील का तिच्याबरोबर? ( साराकडे बघत ) काही घाबरू नकोस ह्याला....काही बोलला तर ये माझ्याकडे, अजून कां पिरगाळू शकते मी त्याचा काय? ( सारा हसते. मालती आजी साराला पुन्हा एकदा जवळ घेते. )

 

हर्षवर्धन : अगं पुरे आता....तिला बिचारीला किती त्रास द्याल? भांबावलीय सगळ्यांच्या सरबत्तीमुळे पोर...असच अजून सुरु राहिलं तर पळून जाईल अमेरिकेला तेव्हा आवरा........तिला आणि ओंकारला आराम करू द्या आता....

 

( सगळे जण हसायला लागतात. मंजिरी साराला घेऊन आपल्या खोलीत जाते. हर्षवर्धन आणि ओंकार कपडे बदलायला जातात आणि मालती आजी मीनाच्या मदतीने आपल्या खोलीत जाते. )

 

फेड आऊट.

 

 

 

 

 

 

 

 

प्रसंग तीन:

 

( हर्षवर्धन आणि मंजिरीची धावपळ सुरु आहे. )

 

हर्षवर्धन ( झब्ब्याचं बटन लावत ) : मंजू, नीट सगळी तयारी झाली ना? आणि मीना कुठे गेलीय? नेमकी आज कुठे काम निघालं तिचं? घरी आज पाहुणे येणार आहेत हे तिला सांगितलेलं ना...तरी अजून कशी नाही उगवलीय आज? आणि किनारामध्ये दिलेली ऑर्डर कधी यायचीय? तो हॉटेलवाला ऐन वेळी उशीर करतो...आपल्याला आधीचा अनुभव आहे...त्याला मीच पुन्हा एकदा फोन करतो...

 

मंजिरी ( बाहेर येऊन हाताने खूण करत ) : अरे हो...किती बोलतोयस? इतका उतावीळ नको होऊस...माहित्ये तुझ्या एकुलत्या एका लेकाच्या लग्नाची बातमी आज आपल्या सगळ्या कुटुंबाला सांगायचीय पण म्हणून असा लहान मुलासारखा काय वागतोयस ? मीना केव्हाच आलीय..तिला मी खाली पाठवलंय बटरस्कॉच आईस्क्रीम आणायला...नाहीतर ऐन वेळी शीला वंस धावडवायच्या तुला गेल्या वेळेसारख्या...आणि किनारा हॉटेलचा माणूस निघालाय मगाशीच...येईल दहा-पंधरा मिनिटात. तू तुझ्या लेकाला सांग तयार  व्हायला, बसलाय आपल्या मित्रांशी बोलत अजून..मी साराकडे बघते. बिचारीला साडी नेसता येत नाही नं अजून...तिला मदत करावी लागेल...अमेरिकन सून असली तरी साडी हवीच...

 

हर्षवर्धन ( मंजिरीकडे बघत ) : क्या बात है....साडी? वा...माई खुश होईल...आणि हो, मी आपल्या चिरंजीवांना जागं करतो....सगळे जण यायचे आणि मुख्य उत्सवमूर्ती गायब असायचे नाहीतर...(ओंकारच्या खोलीकडे जात) ओंकार, तयार झालास का रे? मित्रांशी नंतर बोल...

 

( बेल वाजते. हर्षवर्धन गडबडीने आतून येऊन दार उघडतो. दारात हर्षवर्धनची बहीण शीला, तिचे यजमान विश्वासराव, तिची वीस - बावीस वर्षाची मुलगी अनया आणि मंजिरीची बहीण मंजुश्री, तिचे यजमान निलेशराव आणि त्यांचा पंचवीस वर्षाचा मुलगा अनिकेत असे सगळे जण आलेले असतात. मीना आणि मंजुश्रीच्या हातात फुलांचा बुके आणि भेटवस्तूंचा खोका असतो. )

 

हर्षवर्धन ( हात जोडून ) : अरे या या....क्या बात है...सगळे एकत्रच आलात कि काय आज? बरेच दिवसांनी एकत्र यायचा योग आलाय आज...

 

शीला ( घाईघाईत चप्पल काढत ) : अहो जरा धरा ना बुके...आणि हे गिफ्टसुद्धा....( चप्पल काढल्यावर विश्वासरावांच्या हातात दिलेला बुके आणि गिफ्ट ना घेताच शीला आत येते आणि हर्षवर्धनशी बोलायला लागते ) आणि काय रे हर्ष, कुठे आहे ओंकार? आल्यापासून दोन दिवस गेले आत्याला साधा फोन नाही केला...अमेरिकेला जायच्या आधी अर्धा अर्धा दिवस माझ्या घरी पडीक असायचा अभ्यासासाठी...आणि आता बघ...भेटू दे बघू त्याला, जाबच विचारायचं ठरवलंय मी...

 

( हा संवाद सुरु असताना विश्वासराव आत येऊन बुके आणि गिफ्ट टेबलवर ठेवतात आणि सोफ्यावर बसून तिथूनच हर्षवर्धनला मीनाला गप्पा बसवायची विनवणी करणारी खूण करतात. हर्षवर्धन हाताने त्यांना दुजोरा देतो आणि विषय बदलायच्या उद्देशाने मंजुश्रीकडे बघतो )

 

हर्षवर्धन : अहो या ना...उभे का...बसा...पाणी हवंय का? नाही म्हणजे एव्हाना घसे कोरडे पडले असतील...( शीला वळून त्याच्याकडे बघते आणि बोलायला जाते, हर्षवर्धन लगेच तिला शांत करतो ) अगं म्हणजे...पुण्याच्या ट्रॅफिकमध्ये अर्ध्या तासाच्या अंतरासाठी दीड-दोन तास लागतात तेव्हा चांगलाच 'प्रवास' झाला असेल आज...त्या अर्थाने बोललो...( पुन्हा विश्वासरावांकडे आणि मंजुश्रीकडे बघून डोळे मिचकावत ) तुम्ही पण 'थकले' असाल ना प्रवासात...

 

( खसखस पिकल्याचं बघून शीला चिडते )

 

मीना : कळतंय मला...आणि तुम्ही हसलात तरी चालेल, पण आज काही ओंकारला मी सोडत नाही....

 

( आतून मालती आजी आणि मंजिरी येतात. मालती आजीला बघून अनिकेत आणि अनया पाय पडतात. )

 

मालती आजी : आज किती दिवसांनी योग आला ना सगळे जण एकत्र यायचा....कसे आहात सगळे? ( काठीच्या आधाराने हळू हळू खुर्चीवर बसत ) हर्ष, अरे मीना कुठे गेली रे? सगळ्यांना पाणी दिलंस का?

 

मंजिरी ( लगबगीने स्वयंपाकघराकडे जात ) : माई मीना बाहेर गेलीय, येईलच इतक्यात. मी देते पाणी...

 

शीला : अगं माई आपला ' सेंटर ऑफ अट्रॅक्शन 'कुठे आहे? येताना वाटेत अनया आणि अनिकेत सारखे बोलत होते कि आम्हाला ओंकार दादांशी खूप खूप गप्प्पा मारायच्यात...अमेरिका कशी आहे, अमेरिकेहून काय आणला आमच्यासाठी....( अनयाकडे बघत ) हो ना अनु?

 

( मंजिरी सगळ्यांना पाणी देते आणि हर्षवर्धनच्या बाजूला येऊन उभी राहते. कोपराने हर्षवर्धनला खूण करून त्याला बोलायची खूण करते )

 

हर्षवर्धन ( घसा खाकरत ) : हे बघ ताई, आज तुम्हा सगळ्यांना मी मुद्दाम आग्रह करून यायला सांगितलं कारण मला तुम्हा सगळ्यांना एक मोठं सरप्राईझ द्यायचं आहे. म्हणजे काय आहे, आपला ओंकार उच्चशिक्षण घेऊन आलाय हे तर सगळ्यांना माहित आहेच...शिवाय आजवर आपण सगळे जण एकमेकांना धरून आहोत, एकमेकांशी सगळ्या गोष्टी मनमोकळेपणाने बोलतो...नाही म्हणजे माईने घालून दिलेला हा नियम आपण सगळेच...म्हणजे ही पुढची पिढीसुद्धा पाळते...तेव्हा मला वाटलं की सगळ्यांना एकत्र बसवूनच ही बातमी सांगावी...

 

मंजुश्री : बातमी? कसली बातमी?

 

निलेशराव : काय पट्ठ्याने तिथे चांगल्या कंपनीत चांगल्या हुद्द्याची नोकरीसुद्धा पटकावली की काय? भलतेच फास्ट निघाले तुमचे चिरंजीव...

 

विश्वासराव : अहो निलेशराव, शेवटी 5G पिढी आहे ही...सगळं कसं सुपरफास्ट असतं यांचं...नाही का?

 

मंजिरी ( सगळ्यांना शांत करत ) : एक मिनिट...एक मिनिट...तसं नाहीये...म्हणजे नोकरीसंदर्भात बोलणी सुरु आहेत पण अजून काही पूर्णत्वाला गेलेलं नाहीये...बातमी थोडी वेगळी आहे.

 

शीला ( मोठ्या आवाजात ) : वेगळी म्हणजे? काय तिथल्या प्रेसिडेंटच्या इलेक्शनला उभा राहतोय की काय आपला ओंकार? ( मोठमोठ्याने हसते, पण बाकीच्यांकडून विशेष प्रतिसाद नं आल्यामुळे हसू आवरतं घेते ) आता सांगा तरी...काय मुहूर्त शोधताय का?

 

हर्षवर्धन : माई, मी सांगू की तू सांगतेस?

 

मालती आजी : सगळे जण आता गप्पा रहा. किती वायफळ चर्चा...नमनाला घडाभर तेल ओतलंत एव्हाना...मीच सांगते. शिले, ऐक. बाकीचे पण ऐका रे....ओंकारने माझ्यासाठी अमेरिकेहून नातसून पसंत करून आणलीय. ती सुद्धा अस्सल मराठी. अमेरिकेला जन्माला येऊन आणि मोठी होऊनही मराठी बोलणारी....काय? ओंकारबरोबर आलीय ती...म्हणून दोन दिवस कोणाशी विशेष बोलला नाही ओंकार...आश्चर्याचा धक्का द्यायचा होता तुम्हा सगळ्यांना...काय?

 

( सगळे जण आनंदाने हुरळून जातात. ओंकार आणि साराला बघण्यासाठी सगळ्यांचा गलका सुरु होतो. )

 

मालती आजी : अरे शांत व्हा...ती पोर घाबरेल अशाने...भारतात नवी आहे, पहिल्यांदाच आलीय...जरा गोंधळ कमी करा...( मोठ्याने आवाज देत ) ओंकार, अरे ये रे बाळा बाहेर... ( ओंकार साराला घेऊन येतो. साराने साडी नेसलेली असते ) सारा, ये इथे. हे बघ, हे आपलं कुटुंब. हि ओंकारची आत्या मीना आणि हे तिचे यजमान विश्वासराव...( सारा गोंधळते आणि माईकडे बघते ) अगं यजमान म्हणजे तुम्ही काय म्हणता ते...

 

शीला ( अतिउत्साहात ) : मिस्टर...हे माझे मिस्टर...

 

( विश्वासराव नमस्कार करतात )

 

शीला : आणि हि माझी मुलगी बरं का...अनया.

 

अनया: wassup वहिनी....( हसत हसत ) you look cool ...

 

( सारा गालातल्या गालात हसते. )

 

मालती आजी :  चला, माझ्या नातीने एकदाच माझ्या नातसुनेला हसवलं. आणि सारा, ही मंजिरीची सक्खी बहीण...मंजुश्री. हे तिचे...काय ते...मिस्टर....मिस्टर...निलेशराव आणि हा अनिकेत..ओंकारचा लाडका भाऊ. पण बघ, याला आणि अनयालासुद्धा तुझ्याबद्दल माहित नव्हतं...काय? आम्हा सगळ्यांपासून गधड्याने छान लपवून ठेवलीन तुला...

 

अनिकेत :  आजी, अगदी बरोबर बोललीस. ओंकार दादाला मी किती वेळा online chat करताना विचारलं होत की काय रे, तिथे कोणी आवडली नाही का अजून...तर मला सांगायचं मी इथे फक्त अभ्यासावर लक्ष देतो इतर कुठे नाही....आणि ते ऐकून मला घरी आई-बाबा अभ्यासाला जुंपायचे.. ( ओंकारकडे बघून ) काय छुपा रुस्तम निघालास रे तू दादा...

 

ओंकार ( हसत हसत ) : काही वर्ष थांब, तुझी पण वेळ येईल. आणि सगळ्यांनी मला सांगितलं नाही अजून, कशी वाटली माझी निवड?

 

विश्वासराव : अरे अगदी फक्कड....काय निलेशराव?

 

निलेशराव : माझ्या मनातलं बोललात...

 

मंजुश्री : हो तर, म्हणजे आपल्या पुढच्या पिढीतलं पहिलं लग्न लवकरच होणार तर...काय?

 

शीला : हर्ष, थेट लग्न की आधी साखरपुडा करणार आहेस? आणि मी निक्षून सांगते आत्ताच, साखरपुडा आणि लग्न इथे झालं काय, अमेरिकेला झालं काय किंवा दोन्हीकडे, समारंभाची, मानधनाची, आल्यागेलेल्यांची सगळी जबाबदारी माझी. नवरदेवाची आत्या आहे मी...सोडते काय? मनसोक्त मिरवणार आहे मी...काय रे ओंकार?

हर्षवर्धन : समजलं...आणि मान्य सुद्धा केलं. काय? शिवाय अमेरिकन सून आहे, तिला सगळ्या रितीरिवाजांची माहिती नको द्यायला कोणीतरी? आणि तिथून तिच्या माहेरचे कोण कोण आले तर त्यांची व्यवस्था करायला नको का? तुमच्यापैकी प्रत्येकाला मिळणार आहे काम...भरपूर...काय?

शीला : हो तर...पण माझ्या जबाबदाऱ्या मीच ठरवणार...काय? आत्या आहे, ती पण एकुलती एक....काय? ( हसते )

मालती आजी : उत्साहाला थोडा लगाम घाल गं शिले...करू सगळी हौस तुझी पण आणि बाकीच्यांची पण. तुमचं जाऊदे, पण मी ओंकारच्या लग्नात माझी नथ, शिंदेशाही तोडे आणि ठुशी घालून मिरवणार आहे समजलं? आणि माझ्या नातसुनेसाठी खास जपून ठेवलेले आपले पारंपरिक दागिने तिला देणार आहे मी... आणि हो, घरच्या घरी पुढच्या आठवड्यात छोटासा साखरपुडा उरकायचा बेत आहे. अमेरिकेत वेगळा होईलच...पण अनायासे सगळे जण पुण्यातच आहेत,  तेव्हा म्हंटल करू आपण साधा घरगुती समारंभ...काय?

ओंकार ( चपापून ) : माई अगं हे काय अचानक ? नाही म्हणजे...थेट साखरपुडा? ( माई रोखून बघते तेव्हा सूर बदलून ) नाही म्हणजे...आपण करूया ना सगळं पण आम्हाला जरा वेळ द्या ना....खूप घाई होतेय असं नाही वाटत?

हर्षवर्धन ( मध्ये पडत ) : चिरंजीव, कुरुक्षेत्रावर येऊन लढाईला कसले घाबरता? साखरपुडा करण्याबद्दल बोलतोय आम्ही, लग्न नाही....आणि घरच्या घरीच करू रे...लग्नात करू बाकीची हौसमौज....

( ओंकार साराकडे बघतो. सारा बळे बळे हसून खांदे उडवते. )

मंजिरी ( साराकडे बघत ) : अगं नको तू काळजी करुस...आम्ही आहोत. आणि तुझ्या घरच्यांना आपण कळवू की...ते सुद्धा सामील होतील समारंभात....ते काय तुमचं...कॉन्फरेन्स कॉल....त्या माध्यमातून...काय?

( सारा ओंकारकडे बघते आणि मान डोलावते )

( सगळे जण हसतात. मंजुश्री, शीला आणि मंजिरी साराकडे जाऊन तिची माया घेतात. हर्षवर्धन ओंकारची पाठ थोपटत त्याला विश्वासराव आणि निलेशरावांकडे घेऊन येतो. अनया आणि अनिकेत त्याला मिठी मारतात. सारा हसत हसत माईकडे बघते, माई तिच्याकडे एकटक बघत असते. इतक्यात हॉटेलचा माणूस जेवण घेऊन येतो. )

हर्षवर्धन : चला, जेवण आलं. मीना येताच असेल आईस्क्रीम घेऊन, तयारीला लागूया. मंजू, बघतेस का गं जरा ? मी त्याच्याकडून पार्सल घेतो, तू प्लेट्स काढ...

( सगळे जण जेवणाच्या टेबलाकडे जातात. माई साराकडे एकटक बघत खुर्चीतच बसून राहते आणि साराची नजर तिच्याकडे जाऊन ती स्तब्ध होते. काही सेकंद झाल्यावर ती मान खाली घालून नजर वळवते. ही दोन मिनिटं पहिल्या अंकाच्या समाप्तीचा मुख्य बिंदू आहे.. हर्षवर्धनने बोलावल्यावर माई उठते आणि जेवणाच्या टेबलाकडे चालायला लागते. )

ब्लॅक आऊट.

 

पहिला अंक समाप्त.

 

फेड इन.

प्रसंग चार.

 

( दिवाणखान्यात मंजिरी साराच्या बॅग उघडून बसलेली आहे. सारा तिच्याच बाजूला बसून बॅगमधले कपडे एक एक करून काढत आहे. )

 

मंजिरी : सारा, तुझे सगळे कपडे आपण आता ओंकारच्याच बेडरूमच्या कपाटात लावूया. तसं पण ते आता तुझंच कपाट असणार आहे...मी मीनाला सांगून तुझ्या रिकाम्या बॅग्स आपल्या स्टोरमध्ये ठेवते. बाकी ओंकारचं कपाट म्हणजे एक अजबखानाच आहे म्हणा...शिवाय त्यातून काय काय निघेल सांगता यायचं नाही. तुलाच आता त्याला शिस्त लावावी लागेल.

 

सारा : ममा, नका काळजी करू. मी अमेरिकेला सुद्धा अनेकदा त्याला त्याची रूम आवरायला लावायचे. आणि रूमच नाही, त्याचे हार्ड ड्राइव्ह, त्याचा डेस्कटॉप, टॅबलेट...सगळ्यातला नको असलेला कचरा त्याला काढायला लावायचे. असं म्हणतात की जी माणसं खूप brilliant असतात नं, ती तितकीच अव्यवस्थित पण असतात... ( जीभ चावते ) नाही म्हणजे...ओंकार अगदीच अव्यवस्थित नाहीये....

 

मंजिरी : नाही बोल नं बिनधास्त...मला माहित्ये नं काय आहे तो...अगं शाळेत असल्यापासून असाच आहे तो...पण खरंच, तुझ्यासारखी मुलगी त्याच्या आयुष्यात आली हे बघून मला खूप आनंद झालाय.

 

( आतून ओंकार येतो. )

 

ओंकार : ममा, अगं मला साराला घेऊन बाहेर जायचंय...चालेल नं? माझ्या मित्रांना पण तिला बघायचंय...तो नीरज तर सांगत होता की त्याने पुण्याच्या भटकंतीचा दिवसभराचा प्लॅनसुद्धा तयार केलाय...प्लीज जाऊ का आम्ही? आल्यावर करूया नं आवराआवर? ( साराला उठवत ) नाही नको म्हणूस...प्लीज...आणि बाबांना सांग त्यांची गाडी घेऊन जातोय...बाईकमध्ये गॅस नाहीये...

 

मंजिरी : गॅस?

 

ओंकार : अगं म्हणजे तेच...पेट्रोल...( बूट घालतो आणि साराला घेऊन बाहेर पडतो )

 

मंजिरी : आल्यापासून नुसता वाऱ्यावर स्वार होऊन शहरभर भटकतोय. व्हायचंच....उत्साहात आहे स्वारी...चालायचंच...( स्वतःशी हसत ) आता हा पसारा तात्पुरता आटोपता घ्यायला हवा. ( कपडे पुन्हा बॅगमध्ये ठेवत ) पण आता बॅग बंद कशी करायची? इतकं सामान या बागेत कसं बसवलं असेल साराने, तिलाच ठाऊक....( बागेत कपडे ठेवल्यावर बॅग फुगते ) या वरच्या कप्प्यात काहीतरी जाडजूड भरलेलं दिसतंय, ते काढते म्हणजे आत्तापुरती बॅग बंद होईल....

 

( बागेच्या वरच्या खणातून मंजिरी एक जाड फाईल आणि फोटोंचा अल्बम काढते आणि बॅग दाबून कशीबशी झिप लावते. )

 

मंजिरी :मीना, अगं जरा ये इथे...ही बॅग आपल्या स्टोरमध्ये नेऊन ठेव.

 

( मीना येते आणि बॅग घेऊन जाते )

 

मंजिरी ( अल्बम आणि फाईल घेऊन उठत ) आता हे कुठे ठेवायचं...सध्या इथे टेबलवरच ठेवते. दोघे आले की त्यांच्या पद्धतीने ठेवतील त्यांच्या कपाटात...( घड्याळाकडे बघत ) अरे, माईंची औषधाची वेळ झाली...( माईंच्या खोलीकडे वळत ) माई, औषधं घेऊन येते तुमची...( टेबलच्या खणातून गोळ्यांचं पाकीट काढून त्यातून एक गोळी काढते, टेबलावरच्या पेल्यात पाणी ओतून पेला उचलते आणि माईच्या खोलीकडे जाते. तितक्यात हर्षवर्धन आतून बाहेर येतो. )

 

हर्षवर्धन ( मंजिरीकडे बघत ): अगं हो, सावकाश जरा...आत्ता आपटली असतीस माझ्यावर...( सोफ्याकडे येत ) दोन मिनिट उशीर झालं औषधं घ्यायला तर काय आभाळ कोसळणार आहे का? ( समोरच्या टेबलवर ठेवलेली फाईल आणि अल्बम बघून ) आता हे काय?

 

( हर्षवर्धन फाईल उचलतो आणि उघडत सोफ्यावर बसतो. फाईल चालत चालत त्याच्या चेहेऱ्यावरचे भाव बदलत जातात. तो कपाळावरचा घाम टिपतो आणि फाईल मांडीवर ठेवून अल्बम उचलतो. अल्बमची पानं उलटत उलटत त्याच्या कपाळावर आठ्या पडत जातात. मग तो फाईल उघडतो. ती चालल्यावर त्यातून एक छोटी सीडी बाहेर काढतो. पुन्हा ती सीडी फाईलमध्ये ठेवतो.शेवटी फाईल आणि अल्बम रागारागाने टेबलवर आपटत तो उठतो )

 

हर्षवर्धन : मंजिरी, मंजिरी, इथे ये लगेच....मंजिरी sssss

 

( मंजिरी आतून लगबगीने बाहेर येते. मागून हळू हळू काठी टेकत माई येते. )

 

मंजिरी : काय झालं काय? इतके काय ओरडताय? आणि चेहेरा बघा तुमचा....( जवळ येऊन हर्षवर्धनच्या खांद्यावर हात ठेवते ) इतके कशामुळे चिडला आहात? ओंकार गाडी घेऊन गेला याचा राग आलाय का? अहो ठीक आहे एकदा केलाय त्याने ऍक्सिडेंट, पण म्हणून काय नेहेमी नेहेमी नाही होणार त्याच्याकडून तीच चूक...

 

हर्षवर्धन : मी गाडीसंबंधी बोलत नाहीये....तो अपघात खूप क्षुल्लक चूक होती....आणि इतक्या जुन्या गोष्टीमुळे चिडण्याइतका  मी मूर्ख वाटलो का तुला?

 

मंजिरी : अहो मग झालंय तरी काय असं अचानक?

 

हर्षवर्धन : ही फाईल आणि हा अल्बम बघितलायस? खरं खरं सांग....तुला हे माहित होतं ?

 

मंजिरी : अहो साराच आहे तो...आत्ताच काढून ठेवलाय मी तो आवरावरीत...आणि बाहेर टेबलवर तुम्हाला नको असेल तर मी तो आत नेते...त्यावर इतकं काय राग घालून घेताय डोक्यात....

 

हर्षवर्धन : म्हणजे तुला काहीच माहित नाहीये तर...( मंजिरीसमोर येऊन तिच्या डोळ्यात रोखून बघत ) हा अल्बम तू उघडून बघितलायस?

 

मंजिरी : अहो काय बोलताय...असा कोणाचा अल्बम त्या व्यक्तीच्या अपरोक्ष उघडायचा का?

 

हर्षवर्धन : बरं झालं मला माहित नव्हतं हा अल्बम आणि फाईल कोणाची आहे ते...अनावधानाने उघडून बघितली पण बघितली, ते बरं झालं...चिरंजीवांनी आपल्याला अंधारात ठेवून काय दिवे लावलेयत ते तरी समजलं....( फाईल दाखवत ) हि असली थेरं करण्याइतका आपला मुलगा मूर्ख असेल....( संतापाने थरथरत )...नाही मूर्ख नाही, अतिशहाणा ....अतिशहाणाच...आजकालच्या मॉडर्न विचारांची पिढी ना ही...त्यांना काय वाटणार या सगळ्याच म्हणा...( फाईल टेबलवर आपटत ) पण हे गलिच्छ प्रकार या घरात खपवून घेतले जाणार नाहीत इतक निक्षून सांगतो मी....सगळी अब्रू वेशीला टांगली नालायकाने...नशीब वेळीच समजलं मला...

 

मंजिरी ( हर्षवर्धनला शांत करत ): हे बघा, स्पष्ट बोला काय बघितलंय तुम्ही...आणि थोडे शांत व्हा...बसा...( हर्षवर्धनला पाणी देऊन बसवत ) थोडं शांतपणे आपण बोलूया का? माई, तू आत जातेस....

 

मालती आजी ( मंजिरीचं वाक्य मध्येच तोडत ) : मंजिरी, हर्ष, मी इथेच बसणार आहे. हर्ष, तू काय बघितल्यास त्या फाईलमध्ये ते स्पष्ट सांग....( खुर्चीवर बसत ) आणि डोक्यात राख घालून घेण्यापेक्षा शांतपणे समस्येचा तोडगा निघतो हे विसरू नकोस.

 

हर्षवर्धन ( संतापाने थरथरत ) : अगं कसा शांत होऊ माई मी? बोलायची पण लाज वाटतेय मला...आपला ओंकार अमेरिकेला जाऊन असा बेशरम प्रकार करेल असा मला जरा जरी माहित असतं ना, तरी मी त्याला इथून जाऊच दिलं नसतं....हा नालायक आपल्या घरातल्या मोकळ्या वातावरणाचा असा गैरफायदा घेईल याची स्वप्नातसुद्धा मी कल्पना केली नव्हती....

 

मालती आजी ( थोड्या चढ्या आणि ठाम आवाजात ) : हर्ष, मुद्द्यावर ये. रागाच्या भरात हे विसरू नकोस, की ओंकार तुझा मुलगा आहे....

 

( हर्षवर्धन माईकडे बघून एक सेकंद गप्प होतो, मंजिरीकडे बघतो. मंजिरी स्वतःसाठी पाण्याचा ग्लास भरून घेत असते. हर्षवर्धन पुन्हा फाईलकडे बघून डोळ्यांवरचा चष्मा काढतो आणि डोळे पुसतो. चष्मा डोळ्यांवर लावतो आणि दीर्घ श्वास घेऊन बोलायला लागतो )

 

हर्षवर्धन : माई, मंजिरी, हि फाईल साराची आहे.... ( एक दीर्घ pause ) सारा ही व्यक्ती स्त्री नसून ( पुन्हा एक pause )   पुरुष आहे....

 

( मंजिरीच्या हातातला ग्लास खाली पडतो. )

 

मंजिरी : म्हणजे? काय बोलताय काय? पुरुष? कसं शक्य आहे? नाही म्हणजे मी तिला स्वतः त्या दिवशी साडी नेसवलीय.... तुमचा काहीतरी गैरसमज झालंय हर्ष... अहो, माझ्याबरोबर माझ्या बाजूला झोपतेय ती गेले काही दिवस...ती पुरुष असती तर मला एव्हाना कळलं नसतं का?

 

( हर्षवर्धन मंजिरीचं वाक्य पूर्ण व्हायच्या आत हाताने तिला गप्प राहायची खूण करतो ) 

 

हर्षवर्धन : ही सारा...ही स्त्री म्हणून जन्माला आलेली नाहीये. या फाईलमध्ये तिच्या लिंगबदल शस्त्रक्रियेची सगळी माहिती आहे. तिच्या तिथल्या हॉस्पिटलची फाईल आहे ही. हा अल्बम बघ, यात तिचे आधीचे आणि नंतरचे फोटो आहेत....तिचं मूळ नाव आहे शंतनू. जन्माला येताना शरीरावर स्त्रीचे आणि ( आवंढा गिळत आवाज खोल करून ) पुरुषाचे….. अवयव घेऊन जन्माला आलेली होती ही...म्हणजे...म्हणजे...( संतापाने थरथरत ) एका हिजड्याशी लग्न करायला निघालाय आपला दिवटा....अरे काय समजतो काय स्वतःला? या हर्षवर्धनच्या अब्रूची लक्तरं चव्हाट्यावर मांडताना लाज कशी नाही वाटली याला? नाही म्हणजे आम्हीसुद्धा मॉडर्न आहोत, पण असली थेरं करण्याला जर मॉडर्नपणा समजत असेल ही तरुण पिढी, तर खरंच धन्य आहे....

 

( हर्षवर्धन डोकं धरून संतापाने घळाघळा रडायला लागतो. मंजिरी आणि माई या अनपेक्षित धक्क्याने सुन्न होतात. )

 

मंजिरी : अहो शांत व्हा...आणि कृपा करून संतापू नका...अहो, कदाचित काहीतरी गैरसमज होत असेल आपला....येऊ दे ना दोघांना घरी...आपण बोलूया त्यांच्याशी...माझी खात्री आहे आपला ओंकार इतकं असमंजस वागणार नाही....

मालती आजी : आपण सगळे जण ओंकार आणि सारा आले कि त्यांच्याशी स्पष्ट बोलूया. तोपर्यंत शांत व्हा आणि ते दोघे आल्यावर त्यांच्याशी नीट बोला. आपल्या चार भिंतींच्या बाहेर आपल्या घराच्या कोणत्याही गोष्टींची वाच्यता झाली नाही पाहिजे ही खबरदारी आपण सगळे जण घेऊया.....हर्ष, सावर स्वतःला. मंजिरी, त्याला थोडा वेळ दे.....आणि तू रडू नकोस. ती फाईल आणि अल्बम माझ्या खोलीत ठेव. ( आपल्या खोलीकडे जाते )

 

( हर्षवर्धन उठून आपल्या खोलीकडे जड पावलांनी चालायला लागतात. मंजिरी अल्बम आणि फाईल उचलून माईच्या मागून माईच्या खोलीकडे जाते.)

 

फेड आऊट.

 

प्रसंग पाच.

 

( सारा आणि ओंकार बाहेरून हसत हसत घरात येतात. ओंकार बूट काढत गाडीची चावी भिंतीवरच्या की-होल्डरवर टांगतो. )

 

ओंकार : काय, कसे वाटले माझे मित्र? आम्ही खूप वर्षांपासून एकत्र आहोत...शाळेत एकत्र, पुढे कॉलेजमध्ये एकत्र आणि आता मजा मस्ती करताना पण एकत्र... आमची गॅंग भयंकर मस्तीखोर आहे पण तितकीच जीव लावणारी सुद्धा...

 

सारा: वंडरफुल फ्रेंड्स...आणि खरंच तुम्ही सगळे किती मस्तीखोर आहात...पण मजा आली...I feel blessed ....इतका छान परिवार आणि इतके छान मित्र....what else should I ask for?

 

ओंकार : मी म्हणालो होतो ना तुला...तू ये भारतात, सगळे जण तुझं स्वागत करतील आणि तुला आपल्यातलाच एक करून घेतील... तेव्हा घाबरत होतीस पण आता कळलं ना?

 

( दोघे जण सोफ्यावर अंग टाकून बसतात आणि एकमेकांकडे बघून हसतात. )

 

ओंकार : ममा, डॅड आहात कुठे? आम्ही आलोय....( साराकडे बघत ) तुझ्या सुनेने मला बाहेर जेवू नाही दिलंय....मला म्हणाली ममाच्या हातचं खाऊया....( उठून आत जात ) आहात कुठे सगळे?

 

( सरळ समोर टेबलवर पडलेली फाईल आणि अल्बम दिसतो आणि ती दचकते. घाबरत घाबरत उठून ती आतल्या बाजूला डोकावायला लागते. आतून हर्षवर्धन आणि मंजिरी ओंकारला घेऊन बाहेर येतात. मागून हळू हळू चालत माई येते. )

 

ओंकार ( चालत चालत बाहेर येत ): डॅड, काय झालंय? तुम्ही असे गप्प...मॉम इतकी शांत...काही प्रॉब्लेम आहे का?

 

( ओंकारची नजर साराकडे जाते. सारा टेबलावरच्या अल्बम आणि फाईलकडे बघते आणि ओंकारकडे बघते. ओंकार अल्बम आणि फाईल बघतो आणि बोलता बोलता थबकतो. )

 

हर्षवर्धन : ओंकार, मला वाटतं तुला समजलं असेलच आता....मला अजून काही बोलायची गरज आहे? या फाईल्स मी अनावधानाने बघितल्या आहेत पण बघितल्या आहेत हे महत्वाचं....अन्यथा तुम्ही आम्हाला आयुष्यभर  अंधारात ठेवून स्वतःच इप्सित सध्या करण्याची सगळी तयारी केलेली होतीच....

 

मंजिरी : अरे काय हे ओंकार? अरे मुलगा म्हणून तुझा किती अभिमान आहे आम्हाला....एकुलता एक आहेस रे तू आमचा... ( अचानक आशेचा सूर लावत ) आमचा काही गैरसमज होतोय का? सारा नक्की कोण आहे? अरे आता तरी आम्हाला खरं खरं सांग... ( पुन्हा फाईल बघते आणि मंजिरीच्या आवाज फुटणं थांबतं.)

 

( मंजिरी मटकन सोफ्यावर बसून रडायला लागते. हर्षवर्धन तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला जवळ घेतो आणि बाजूला बसतो. माई खुर्चीवर बसते.)

 

मालती आजी : ओंकार, सारा, माझ्या समोर बसा. हर्ष, मंजिरी, तुम्ही आता शांत व्हा. मला ओंकार आणि साराकडून ऎकायचंय सगळं. ओंकार,भारतात येईपर्यंत तू घरातल्या सगळ्यांपासून साराची बातमी लपवलीस, हे मी एक वेळ समजू शकते. तू परस्पर तिच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला, हेही मी समजू शकते. पण इतका मोठा खोटेपणा मात्र मी खपवून घेऊ शकत नाही. तुम्ही दोघे मला स्पष्ट शब्दात सगळं काही खरं सांगा. ( हर्षकडे आणि मंजिरीकडे बघत ) तोपर्यंत कोणीही काहीही बोलणार नाही.

 

( ओंकार खुर्चीवर बसून साराच हात आपल्या हातात घेतो. तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला धीर देतो आणि मालती आजीकडे बघून बोलायला सुरुवात करतो )

 

ओंकार :माई, मॉम, डॅड, सगळ्यात आधी मी आणि सारा तुम्हा सगळ्यांची मपणासून आणि हात जोडून माफी मागतो. तुम्हाला अंधारात ठेवायचा ,तुमची फसवणून करायचा किंवा तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घ्यायचा आमचा काहीही हेतू नव्हता. हे जे काही आहे, ते तुमच्यापासून आम्हाला लपवायचं कधीच नव्हतं. आम्ही फक्त योग्य वेळ यायची वाट बघत होतो. एअरपोर्टला साराची ओळख करून दिली तेव्हा डॅड आणि ममा काही सेकंद... काही सेकंदच शांत झाले पण त्यांनी आनंदाने तिला जवळ घेतलं. घरी तू चिडशील वाटलेलं माई, पण तू सुद्धा आम्हाला समजून घेतलंस. सारा दोन दिवसात घरात इतकी रुळली की ती हे सुद्धा विसरली की ती आपल्या घरात पहिल्यांदा आलेली आहे. हे सगळं इतक्या सहज साध्य होईल असा मला खरंच वाटलं नव्हतं......

 

मालती आजी : म्हणून तुम्ही ठरवलंत की हि इतकी महत्वाची गोष्ट घरच्यांपासून लपवायला काय हरकत आहे, बरोबर ना?

 

ओंकार : माई, असं नाहीये...तुझा गैरसमज होतोय....

 

( सारा ओंकाराचा हात दाबते. त्याच्याकडे बघते आणि त्याला मन हलवून शांत व्हायची विनंती करते. मग स्वतः उठून मालती आजीच्या पायाशी जाऊन बसते आणि आजीचा हात धरते.)

 

सारा: माई, मला आता मोकळं होऊ दे. हे सगळं माझ्यामुळे होतंय, तुमच्या सगळ्यांची अपराधी मीच आहे, तेव्हा मलाच आता व्यक्त होऊ दे. माई, अमेरिकेत मला ओंकार भेटला तेव्हा मी एका विचित्र परिस्थितीतून जात होते. मुळात तुम्हाला सगळ्यांना हि गोष्ट समजून घ्यावी लागेल, की तुम्हा सगळ्यांना जन्म देताना देवाने पूर्णत्व बहाल करूनच या जगात पाठवलेलं आहे....पण मला...मला मात्र ते भाग्य मिळालं नाही. मी जन्मले तेव्हा मी पुरूषच दिसत होते........पण वय वाढत गेलं तशा माझ्या शरीरावर स्त्रीत्वाच्या खुणा उमटायला लागल्या. मलासुद्धा हळू हळू समजायला लागलं की मी आतून एक स्त्री आहे…..स्रीत्वाकडेच माझी ओढ होती. आजूबाजूच्या मुलांबरोबर मी कधीच comfortable नव्हते, कारण माझ्या शरीरात आत्मा होता एका स्त्रीचा. माझ्या भावना, माझ्या संवेदना आणि माझ्या वेदना....सगळं सगळं फक्त एका स्त्रीचं होतं....माझ्या वडिलांनी आणि आईने मला आधी मानसोपचारतज्ज्ञांकडे नेलं...तिथे माझ्या स्त्रैण वागण्यावर त्यांनी उपचार करायचा प्रयत्न केला….. शेवटी त्यांनी माझी मेडिकल टेस्ट करायला सांगितली आणि खऱ्या गोष्टीचा उलगडा झाला....

 

माई, लहानपणापासून माझा माझ्याशीच झगडा सुरु असायचा....मला तेव्हा पडलेले प्रश्न माझ्या घरच्यांना धर्मसंकटात टाकायचे...माझी मॉम खूप रडायची. डॅड माझा द्वेष करायचे. माझ्यासारखं मूल जन्माला घातल्याबद्दल माझ्या मॉमला त्यांनी शेवटी सोडलं....मी माझ्या मॉमबरोबरच वाढले...पण वय वाढू लागलं तसा माझ्या शरीरात बदल घडायला लागला होता....आजूबाजूच्यांना मी mixed gender person  असल्याचं समजायला लागलं होतं...माझ्या मॉमला खूप मनस्ताप व्हायचा या सगळ्याचा....तीन वर्षांपूर्वी ती गेली तेव्हा मी नुकतीच युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेतला होता.

 

मॉमने माझ्यासाठी एक चिट्ठी लिहून ठेवली होती...तिने त्यात लिहिलं होतं, की तू एक स्पेशल व्यक्ती आहेस...तुला संघर्ष करायचा आहे आणि या जगात स्वतःचं स्थान निर्माण करायचं आहे...तुला स्वतःला 'परिपूर्ण' करायचं आहे...या अशा अवस्थेत मी एक वर्ष काढलं आणि शेवटी पुन्हा शिक्षण सुरु केलं...आणि तिथे मला ओंकार भेटला....

 

माई, ओंकारने मला माझी ओळख निर्माण करायला प्रोत्साहित केलं. त्याने मला पटवून दिलं की तू मनाने स्त्री आहेस. तुझ्या शरीरावर पौरुषत्वाचं ओझं लादलं गेलेलं आहे...पण ते झुगारून द्यायला आता अनेक मार्ग उपलब्ध आहेत....निसर्गाने तुझ्या आयुष्यात incompleteness निर्माण केला असला तरी त्यावर आता कितीतरी medical solutions available आहेत...त्यानेच मला धीर दिला आणि शेवटी मी operation करून घेतलं....माझ्यासाठी तो क्षण पुनर्जन्मापेक्षा वेगळा नव्हता...

 

डॅड, ममा, माई, आपल्या शरीरात ट्युमर झाला तर आपण operation करून तो काढून टाकतोच ना...तसंच नाही का हे? शरीराचा unwanted भागच मी सुद्धा काढलाय ना? हे सगळं समजेपर्यंत तुम्ही माझं किती कौतुक करत होता....मी किती सुंदर आहे, मी कशी अमेरिकेची असूनही मराठी आहे....मला तुम्ही किती प्रेम दिलं या काही दिवसात...आणि आज हे कळल्यावर अचानक माझ्याबद्दल इतका राग का आला तुम्हाला? एक व्यक्ती म्हणून माझ्यात असं काय बदललाय की तुम्ही अचानक माझ्याशी इतकं रुक्ष वागायला लागला आहात? Am I not the same Sara you liked?

 

हर्षवर्धन ( उसळून ) : का राग आला? लाज नाही वाटत हे विचारायला? आमच्या एकुलत्या एका मुलाचं लग्न एका...एका.....( आवंढा गिळून ) एका तृतीयपंथी व्यक्तीशी करून द्यायचं मी? का? तुमच्या अमेरिकेत चालत असतील अशी थेरं...पण माझ्या घरात हे खपवून घेतलं जाणार नाही...

 

मंजिरी: हे बघ सारा...शंतनू...जे पण तुझं नाव आहे....आम्हाला तुझ्या आयुष्यात तुझ्याबरोबर जे जे काही घडलं, त्याच्याबद्दल खूप वाईट वाटतंय आणि तुझ्याबद्दल आम्हाला पूर्ण सहानुभूती सुद्धा आहे....पण म्हणून आमच्या स्वप्नांची अशी राख होताना मी नाही सहन करू शकत....ओंकार आमचा एकुलता एके मुलगा आहे... त्याच्या आयुष्याच्या इतक्या मोठ्या निर्णयात आम्ही आई-बाप म्हणून ही अशी तडजोड का स्वीकारायची? निदान तू तरी आमच्या बाजूने विचार कर....

( ओंकार उठून उभा राहतो. )

 

ओंकार : मॉम, तडजोड कसली? आणि काय तडा गेला तुमच्या स्वप्नांना? आता तूच सांग, जर तुम्हाला हे सगळं समजलंच नसतं, तर हीच सारा तुम्हाला आदर्श सून वाटत राहिली असतीच ना? आणि मला ती मनापासून आवडलेली आहे...मी तिच्याबरोबर आयुष्य आनंदाने जगू शकतो इतकं तुम्हाला पुरेसं नाही का? तुम्ही माझे मॉम-डॅड आहात आणि राहाल...पण माझ्या आयुष्याचा निर्णय घ्यायचा अधिकार माझा नाही का ? मॉम, डॅड, या साराकडे मी केवळ एक स्त्री म्हणून बघतो.....तिच्या शरीरापेक्षा मला तिच्या मनात असलेली एक संपूर्ण स्त्री मला जास्त महत्वाची वाटते.... त्या स्त्रीवर मी मनापासून प्रेम केलंय आणि करत राहीन....यात मी गैर काय करतोय?

डॅड, तृतीयपंथ म्हणजे काय? मुळात हे प्रथम, द्वितीय आणि तृतीय म्हणजे काय? आपण आपल्या सोयीसाठी केलेली क्रमवारीच ना? आणि डॅड, मी प्रेम केल ते साराच्या स्त्रीत्वावर...जी व्यक्ती आतून स्त्रीच आहे, ती केवळ निसर्गाने चुकीने निर्माण केलेल्या एका अवयवापायी पुरुष होईल? लहानपणापासून सारामधली स्त्री त्या शरीराच्या आत घुसमटत होती...मी बघितलीय ती घुसमट...डॅड, आपण कोणीही ती घुसमट अनुभवू शकत नाही...पण ती समजून घ्यायला काय हरकत आहे? मी तिला शस्त्रक्रिया करायला सांगण्यामागे माझाही उद्देश हाच होत, की ज्या अवयवांमुळे तिच्यातल्या स्त्रीची घुसमट होतं होती, तो काढून टाकल्यावर तिच्यातली तरी स्त्री मोकळा श्वास घेऊ शकेल...डॅड, मॉम, मी काय चुकीचं केलं हे तरी मला समजेल का? मॉम, सारामधली ती स्त्री तुझ्यासारखीच आहे....संवेदनशील, स्ट्रॉंग, हळवी, सगळ्यांना समजून घेणारी...म्हणून तर मला ती भावली, आवडली....एक व्यक्ती म्हणून, लाईफ पार्टनर म्हणून आणि....या घरची सून म्हणून....

 

( हर्षवर्धन एकदम मूठ टेबलवर आपटतो )

 

हर्षवर्धन : ओंकार, या हिजड्याची तुलना तू तुझ्या आईशी करतोयस? एक शब्द अजून बोललास तर याद राख.....( संतापाने फुत्कारत ) या घरात असल्या प्रकारांना थारा नाही हे मी तुला शेवटचं निक्षून सांगतो.( साराकडे बोट दाखवत ) याया प्रकाराला आत्ताच्या आत्ता घराबाहेर काढ....मी देतो अमेरिकेची तिकिटं काढून...पण मला आता हे सगळं या घरात नकोय.... तुमच्या त्या मॉडर्न विचारांना हे सगळं पटत असेल पण मी या गलिच्छ प्रकाराला कदापि मान्य करणार नाही...

 

ओंकार : डॅड, इतका तिरस्कार? इतकी घृणा? आणि का तर तुम्हाला फक्त हे स्वीकारणं जड जातंय, की तुमच्या समोर असलेली सारा ही मूळची शंतनू होती? त्यापेक्षा ती आजची सारा आहे आणि यापुढेही ती साराच राहणार आहे हे तुम्ही स्वीकारा ना... भूतकाळापेक्षा वर्तमानात जगावं आणि भविष्यकाळाकडे नजर ठेवून वाटचाल करावी हे तुम्हीच शिकवलंय ना मला?

 

मंजिरी : अरे लोक काय म्हणतील....विचार कर, सगळे जण हसतील रे आपल्यावर.... अरे, तिथे अमेरिकेत कदाचित या सगळ्याला मान्यता असेलही पण आपल्याकडे या सगळ्याकडे बघण्याचा दृष्टीकोन खूप वेगळा आहे लोकांचा...आपण कसं वावरायचं समाजात उजळ माथ्याने?

 

ओंकार : का? लोकांना ही गोष्ट सांगायला कोणी जाणार आहे का? मॉम, तू, डॅड आणि माई यापलीकडे कोणाला आमचं नातं मान्य आहे की नाही याची मला काहीही फिकीर नाही...किंबहुना हे गुपित आपल्यातच राहिलं तर तू म्हणतेस तसं तुला किंवा डॅडना कोणाला काही उत्तर द्यावं लागणारच नाही...माझ्यासाठी बाकीचे लोक म्हणजे उंबरठ्याबाहेरचं जग...त्याची मला पर्वा नाही... कोणाला कळलं तरी मला त्यात काही गैर किंवा लज्जास्पद आहे असं नाही वाटत...उलट मी अभिमानाने सांगेन की आमच्या दोघांमधलं नातं भावनिक आहे, आत्मिक आहे आणि म्हणून विशुद्ध आहे...

 

मंजिरी ( गयावया करत ) : अरे, काही दिवसांपूर्वी आपल्या गावच्या त्या सदानंदचा मुलगा… ( अवघडलेला सूर लावत ) गे असल्याची बातमी फुटली तेव्हा गावाने त्याच्या सगळ्या घराला जवळ जवळ वाळीत टाकलं रे...बाहेर तोंड दाखवायला जागा उरली नाही त्याला....आपण समाजाचा एक भाग आहोत हे विसरू नकोस...समाज हसेल आपल्यावर....बाकीच्यांचं सोड, आपल्याच नातेवाईकांना.....मंजुश्री मावशीला, शीला आत्याला....आपण काय तोंड दाखवायचं रे? एकतर त्यांच्यासमोर आपण साराला या घरची सून म्हणून मिरवलीय...त्यातून कसा मार्ग काढायचा ही चिंता आहे आधीच...

 

ओंकार ( मंजिरीपुढे उभा राहून ) : मॉम, मी पुन्हा एकदा सांगतोय, आपल्या चौघांच्या बाहेरच्या कोणाची मला पर्वाही नाही आणि चिंताही...त्यांनी हे नातं मान्य केलं तर उत्तमच पण नाही केलं तरी मला चालेल...ते त्यांचं स्वातंत्र्य आहे...मला फक्त तू, डॅड आणि माई - तुम्हा तिघांच्या होकाराचीच गरज आहे...

 

हर्षवर्धन : छान, म्हणजे आपले नातेवाईक नकोत तुला...ते बाहेरचे आणि पण हा हिजडा उंबरठ्याच्या आतला का? अरे आपल्या घरचा उंबरठा बघायची सुद्धा ज्याची लायकी नाही त्याला या घरचा सदस्य म्हणून मी स्वीकारू म्हणतोस? असले छप्पन्न दिसतात रोज मला सिग्नलवर टाळ्या वाजवून भिका मागताना....

 

मालती आजी ( मोठ्या करारी आवाजात ): हर्ष, एक शब्द यापुढे बोललास तर याद राख.... ( हर्ष एकदम ओशाळतो आणि शांत होतो, पण रागाने थरथरत तसाच बसून राहतो )  साराबद्दल अपशब्द मी ऐकून घेणार नाही....जिभेला यावर घाल....काय शब्द वापरतो आहेस याच भान ठेव....तुला जे वाटत आहे, ते बोल पण मर्यादेत राहून अन्यथा ही माई आजसुद्धा तुझे कान उपटायला खंबीर आहे....या मुलीने इतकं सगळं ऐकलं, पण एकदाही तोंडातून वाईट  शब्द काढलेला नाही आणि तू? ( बोट उगारून ) आता जे बोलशील, ते विचार करून बोल आणि साराच पूर्ण मान राखून बोल, अन्यथा तू इथून निघून गेलास तरी चालेल....

 

( हर्षवर्धन आणि मंजिरी अवाक होऊन माईकडे बघतात. हर्षवर्धनच्या तोंडून शब्द फुटायचा बंद होतो आणि त्याचं वासलेलं तोंड तसंच राहतं. मंजिरी स्तब्ध होते. )

 

मालती आजी : सारा, ओंकार, हे सगळं आमच्यापासून लपवण्यामागे तुमचा काय उद्देश होता? माझ्या या प्रश्नाचं मला समाधानकारक उत्तर हवंय. हा सगळं तमाशा होईल अशी तुझी खात्री होती म्हणून ही लपवाछपवी केलीस? की आम्हाला या सगळ्या गोष्टी सांगायच्याच नव्हत्या तुम्हाला? 

 

सारा : माई, तसं नाही....तसं असतं तर हि फाईल आणि हा अल्बम आम्ही यातना आणलाच का असता ? अमेरिकेत ठेवून आलो असतो तर इथे कोणाला कळलं तरी असतं का? तुम्हाला फसवायचा आमचा काहीही उद्देश नव्हता....

 

मालती आजी : मग काय कारण होतं हे सगळं लपवायचं?

 

ओंकार : माई, आम्हाला हळू हळू तुम्हाला सगळ्यांना विश्वासात घेऊन टप्प्याटप्प्याने हे सगळं सांगायचं होतं.मला कल्पना आहे, की या गोष्टी स्वीकारणं खूप कठीण आहे. अमेरिकेत सुद्धा आम्हाला खूप वाईट अनुभव आले...आमच्या relationship बद्दल सांगितल्यावर आमच्या अनेक मित्रांनी आमच्याबरोबरचे संबंध कमी केले...आम्हाला लोक हसले, आमची थट्टा केली....त्यामुळे आम्हाला माहित होतं, की याचा त्रास होणार. आमचा उद्देश इतकंच होता, की तुम्हा तिघांना हे योग्य वेळ आली की सांगायचं....डॅड, विश्वास ठेवा, आम्ही तुम्हाला हे सांगितल्याशिवाय साखरपुडासुद्धा करणार नव्हतो. तुम्हाला अंधारात ठेवून आम्हाला काहीच साध्य करायची इच्छा नव्हती आणि यापुढेही नसेल....फक्त आम्ही थोडा वेळ घेत होतो.

पण माझी अशी भाबडी खात्री होती, की तुम्ही तिघे आम्हाला समजून घ्याल आणि आमच्या प्रेमाचा आदर कराल....डॅड, मॉम, तुमच्याकडून अशा प्रतिक्रियेची मी अपेक्षाच ठेवली नव्हती...मला वाटलं होतं की तुम्हाला धक्का लागेल पण साराच्या वागणुकीकडे आणि स्वभावाकडे बघून तुम्हीही तिला तुमची सून म्हणून खुल्या मनाने स्वीकाराल....माई आणि आमच्या पिढीत खूप मोठी generation gap आहे....तेव्हा तिची समजूत काढायला आम्हाला मदत कराल...पण....

मंजिरी : पण काय? आम्ही तुझ्या अपेक्षेप्रमाणे नाही वागलो हेच ना? आहोत आम्ही नालायक...असा समाज तुझ्याइतके प्रगल्भ आणि उच्च विचार नाहीत आमचे...पण एक आई म्हणून आणि बाप म्हणून आम्हाला काय वाटतंय, हे तुला कधीच कळू शकणार नाही....आहे आमची पिढी मूर्ख...नाही आम्हाला तुमच्याइतकी अक्कल पण म्हणून आंम्ही काय वाट्टेल ते स्वीकारायचं? दोन पुरुषांचे किंवा दोन स्त्रीचे संबंध बघितले होतेच...आता हेही बघितलं....या विकृतींना तुमची पिढी कशी रे स्वीकारू शकते?

 

सारा : डॅड, मॉम, माफ करा पण याला विकृती नका बोलू...मी आणि ओंकारने कधीही आमच्या संबंधाची व्याख्या शोधायचा प्रयत्न केला नाही.....आमच्या नात्यात प्रेमाव्यतिरिक्त दुसऱ्या कशाची आम्हाला गरजच वाटली नाही....ओंकारने माझ्यात नेहेमी एक complete स्त्री बघितली....त्या स्त्रीचं नाव शंतनू कि सारा हा प्रश्न त्याला कधीच पडला नाही....मग हे आमचं प्रेम disgusting आहे की pure? आमच्या बाजूने एकदा तरी विचार करून बघा....

 

तुम्ही म्हणता तशी अमेरिकेतली माणसं प्रगल्भ नाहीत..उलट तिथे मला पावलोपावली फक्त सहन करावं लागलं...अवहेलना, टिंगल.....I was bullied by all…right from my school days…. इतरांप्रमाणे मी कधीच बिनधास्त जगू शकले नाही...साधं toilet ला जाताना विचित्र comments ऐकल्यात मी.... पण ओंकार भेटल्यावर मला पहिल्यांदा मी आहे तशाच स्वरूपात मला स्वीकारणारा कोणीतरी भेटला मला...त्याने मला आधार दिला, धीर दिला....मला वाटलं, तुमच्या सगळ्यांकडूनही मला तेच प्रेम मिळेल...तीच आपुलकी मिळेल...

 

हर्षवर्धन : मी तुझ्यापुढे हात जोडतो....मला या प्रश्नांची उत्तरं शोधण्यात आणि देण्यात काहीही रस नाही....आमच्या मुलाला आमच्यापासून तोडू नकोस आणि इथून निघून जा, हा एकच विनंती आहे माझी....हे घर तुझ्या लायकीचं नाही असं समज हवं तर.....

ओंकार : डॅड,मी आणि सारा वेगळे होऊ शकत नाही....जर या घरात ती येऊ शकणार नसेल, तर मी सुद्धा हे घर सोडून जाईन...

मंजिरी: का? का हा अट्टाहास? अरे तू तुझ्या हट्टापायी तुझ्या आईबापाला सुद्धा सोडून द्यायला तयार होतोयस पण हिला सोडायला तयार होतं नाहीयेस...ही आमच्यापेक्षा मोठी आहे का रे तुझ्यासाठी?

ओंकार : मॉम, तुम्ही चुकीचे वागत आहात म्हणून मला हे पाऊल उचलावं लागत आहे....मला काही आनंद होतं नाहीये हे सगळं करतांना, पण तुमच्या आडमुठेपणापायी मी तिच्या आयुष्याशी खेळू शकत नाही....मला वाटलं होतं की तुम्हाला आमचा अभिमान वाटेल...आमच्या लग्नात तुम्ही सगळ्यात आनंदी असाल पण....

 

हर्षवर्धन ( उसळून ) : लग्न? हे असले घाणेरडे चाळे घराबाहेर जाऊन कर आणि पुन्हा पाऊल ठेवू नकोस इथे....मी समजेन मला मूलबाळ नव्हतंच.....( मंजिरीला धरून उठवत ) चल मंजू, मला याचं तोंड सुद्धा बघायचं नाही....मान शरमेने खाली घालायला भाग पडणारा असला मुलगा असण्यापेक्षा नसलेला बरा....

 

( हर्षवर्धन आणि मंजिरी आत निघून जातात. )

 

ब्लॅक आऊट.

 

प्रसंग सहा.

 

( दिवाणखान्यात माई खुर्चीवर बसलेली आहे. समोर हर्षवर्धन आणि मंजिरी शांतपणे बसलेले आहेत. ओंकार आणि सारा माईच्या बाजूला उभे आहेत. मागे चार-पाच बॅग्स आहेत. )

 

ओंकार : माई, डॅड, मॉम, मला माफ करा. मी कदाचित तुम्हाला अभिप्रेत असलेला आदर्श मुलगा नाही होऊ शकलो....पण साराला मी एकटं सोडून नाही राहू शकत. डॅड, आजपासून तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी तुमच्या घरात नाही राहणार....मी आणि सारा आमचं आयुष्य शून्यापासून सुरु करणार आहोत. तुमच्या सद्सद्विवेकबुद्धीला माझी बाजू कधीतरी पटेल अशी मला आशा आहे...तुमची मान खाली जावी असं काहीही माझ्याकडून होणार नाही ही तुम्हाला मी खात्री देतो. डॅड, ममा,  सारा आणि मी आयुष्यभर तुमची वाट बघू....

( ओंकार बाहेर पडायला वळणार तोच मालती आजी त्याला थांबायची खूण करते.)

मालती आजी: ओंकार, सारा, थांबा. काल जे सगळं झालं, त्यावर मी खूप विचार केला आहे. तो अल्बम आणि ते रिपोर्ट्स मी नीट वाचलेले आहेत आणि समजून घेतलेले आहेत. या सगळ्यावर माझं म्हणणं अजून मी सगळ्यांसमोर मांडलेलं नाही.... या घरात आजवर माझा शब्द अंतिम मानला गेलेला आहे, तेव्हा माझी बाजू नं ऐकता तुम्ही या घराबाहेर जाऊ शकणार नाही. इथे या आणि माझ्या समोर बसा.

 

( ओंकार आणि सारा माईसमोर बसतात. )


मालती आजी : हर्ष, मला तुझ्याकडून एका प्रश्नच उत्तरं हवंय.

हर्षवर्धन ( मान खाली ठेवूनच ) : बोल माई....


मालती आजी : तुला जर सत्य समजलं नसतं, तर साराला सून म्हणून स्वीकारायला तुझी काही हरकत असती?


हर्षवर्धन ( माईकडे नं बघता मान वर करून इतरत्र बघत ) : माहित नाही...


मालती आजी  ( हसून ) : मला उत्तरं मिळालं आहे....आणि मंजिरी, तुझं काय मत आहे?

 

मंजिरी : माई, झाकली मूठ असती तर हा प्रश्नच आला नसता ना...आणि सगळ्या गोष्टी लक्खपणे समोर असताना जरतरच्या प्रश्नांना उत्तर देण्यात काय हशील?

 

मालती आजी : मला नीट आठवतंय मंजिरी, तो अल्बमचा प्रसंग घडण्याआधी तू साराबद्दल भरभरून कौतुक करत होतीस....इतकी सुरेख आणि गुणी सून मिळाल्याबद्दल देवाचे आभार मनात होतीस....हो नं? आणि हर्ष, तू सुद्धा ओंकार आणि साराबद्दल अभिमानाने चार कौतुकाचे शब्दच बोलत होतास....हो नं? तेव्हा तुम्हाला सारा ही व्यक्ती म्हणून आवडली होती की…….तिच्या अमेरिकन आणि उच्चशिक्षित असण्यानेच तुम्ही हुरळून गेला होता?


हर्षवर्धन ( चपापून ) : काहीही काय माई...

 

मालती आजी : म्हणजे एक व्यक्ती म्हणून सारामध्ये तुम्हाला काहीही गैर अथवा अस्वीकारार्ह दिसलं नव्हतं...बरोबर ना?

 

( मंजिरी आणि हर्षवर्धन नुसती मान हलवतात. )

 

मालती आजी :  ओंकार आणि साराची चूक असेल तर इतकीच की त्यांनी पहिल्याच दिवशी आपल्यासमोर साराच्या भूतकाळाबद्दलची इतकी मोठी गोष्ट सांगितली नाही. पण त्यांच्या बाजूने विचार केला तर ते त्यांच्या जागी बरोबरच होते. मला इथे एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते, की हर्षने अद्वातद्वा बोलूनही दोघांनी एकदाही आपल्या मर्यादा ओलांडल्या नाहीत...हर्ष, या दोघांचं एकमेकांवर निरतिशय प्रेम आहेच, पण त्या प्रेमावरचा विश्वास सुद्धा इतका इतका दृढ आहे कि त्यांनी त्याच विश्वासापायी सगळा अपमान सहन करून तुमच्या विरोधात जायचं पाऊल उचललं...आणि ते उचलतानाही त्यांनी तुमच्याशी असलेलं नातं तोडलं नाही.

 

हर्ष, मंजिरी, तुम्हाला ऐकायला वाईट वाटेल पण खेदाने मला हे सांगावस वाट्यात, की आई-बाप म्हणून तुम्ही ओंकारला समजून घ्यायला कमी पडलात. आपल्या घरचे संस्कार त्याच्या प्रत्येक कृतीतून दिसत असूनही तुम्ही त्याला दोष देत गेलात. ( साराकडे बोट करून ) या मुलीला तुम्ही मुलगी म्हणून स्वीकारायला तयार नसला तरी ती मुलगी आहे हे वास्तव आहे...तिच्या भूतकाळात घडलेल्या गोष्टी तिच्या हातात नव्हत्या...कोणताही मनुष्य जन्माला येतो तो ( बोट आणि मान वर करून ) त्याच्या मर्जीने....सारा ज्या अवस्थेत जन्माला आली त्यावर तिचं नियंत्रण नव्हतं...मग तिला त्याबद्दल दोष देण्याने आपण काय साध्य करणार आहोत? मला अभिमान वाटतो माझ्या नातवाचा, ज्याने तिला पूर्णत्व दिलं...शारीरिक आणि मानसिकही...मंजिरी, तुझ्या मराठी व्याकरणाच्या भाषेत बोलायचं तर देवाने ज्या वाक्याच्या शेवटी अर्धविराम देऊन वाक्य अर्धवट सोडलं होतं, ते तुझ्या मुलाने पूर्णविराम निर्माण करून अर्थबद्ध केलंय...एखाद्याच्या आयुष्यात असा पूर्णविराम निर्माण करणं काही सोपं नाही...

 

हर्षवर्धन : माई, माफ कर पण मला आणि मंजिरीला हे स्वीकारणं शक्य नाही....शब्दांचे कितीही खेळ केले तरी वास्तव हेच आहे, की ओंकारने आम्हाला गृहीत धरलं आणि आमच्या भावनांचा यत्किंचितही विचार नं करता हे नातं आमच्यावर लादलं. आम्ही ते कदापि स्वीकारू शकणार नाही, ही काळ्या दगडावरची रेघ आहे आणि राहील... ( पुन्हा इथे तिथे बघायला लागतो )

 

मंजिरी : माई, मी इतकंच बोलेन, की तुझ्याच बोलण्यानुसार...देवालाच जे वाक्य अपूर्ण ठेवायचं होतं, ते पूर्ण करण्याचा अट्टाहास करणं  माझ्यासाठी वेडेपणाच आहे...माझा माझ्या मुलावर कितीही जीव असला तरी मला हा वेडेपणा मान्य नाही.... जे त्यालाच अपूर्ण ठेवायचं होतं, ते माझ्यासाठीही अपूर्णच राहील...कायम...

 

मालती आजी ( एक दीर्घ उच्छ्वास सोडून ) : ठीक आहे. तुम्ही सगळे जण आपापला निर्णय घ्यायला स्वतंत्र आहात. पण जसे तुम्ही स्वतंत्र आहात, तशी मी सुद्धा माझा निर्णय स्वतंत्रपणेच घेणार. आणि माझा निर्णय हा आहे, की मला माझ्या नातवासाठी साराशिवाय दुसरी कोणी सुयोग्य नातसून असू शकेल असं वाटत नाही. त्यांच्या लग्नाला माझा पूर्ण पाठिंबा आहे आणि होकार सुद्धा आहे.

 

हर्षवर्धन ( ताडकन उठून उभा राहात ) : माई? काय बोलतेस काय तू? तू सुद्धा? अगं एकदा विचार कर...आपण लोकांना काय तोंड दाखवणार...समाज छी थू करेल आपल्यावर...

 

मालती आजी : त्याची वेळ कधीच येणार नाही. या माईने आपली सगळी हयात अनाथ, असहाय्य लोकांना आपल्या आश्रमात आश्रय देऊन त्यांच्या आयुष्यात चार सुखाचे क्षण आणण्यात घालवली.... तृतीयपंथी म्हणून हिणवल्या जाणाऱ्या अनेकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणलंय....तू काल म्हणालेलास त्याप्रमाणे ते काही फक्त सिग्नलवर उभे राहून भीक मागण्याच्या लायकीचे नसतात...त्यांच्यातही आशाआकांक्षा असतात पण आपला समाज त्यांना स्वीकारत नाही....तोच समाज ज्याचा तू सुद्धा एक भाग आहेस....

डोक्यावर छत्र नसलेल्यांना काय भोगावं लागत, ते तुम्हाला कधी कळणार नाही हर्ष, त्यासाठी ते एक तर भोगावं लागतं किंवा अनुभवावं लागतं...या मुलीच्या आयुष्यात सुखाचे क्षण निर्माण करणारा माझा नातू माझ्यासाठी माझ्या आयुष्यभराच्या तपश्चर्येचं मला मिळालेलं फळ आहे...तुम्ही आपल्या पोकळ अहंकाराला कवटाळून त्याला दूर करा, पण ही माई आपल्या आश्रमातल्या लोकांच्या साक्षीने या दोघांचं लग्न लावून देईल...( काठीच्या आधाराने उठत ) या घरातून आज ओंकार आणि सारा बाहेर पडतील, ते या माईच्या आशीर्वादाने.

 

हर्षवर्धन : छान...म्हणजे घर आणि आश्रमातील फरकसुद्धा आता तू या दोघांच्या हट्टापायी पुसून टाकायला निघालेली आहेस.....छान ! पण माई, एका गोष्टीचं उत्तर देशील? तुझ्या मते जी व्यक्ती स्त्री आहे, ती आई व्हायच्या लायकीची नसेल तर तिला स्त्री म्हणण्यात काय अर्थ आहे? कमीत कमी हा विचार करून तरी तुझा हट्ट मागे घे?

 

मालतीआजी ( मंद हसत ओंकार आणि साराकडे बघून ) : ओंकार, सारा, काही बोलाल?

 

सारा : माई, मी बोलू? डॅड...सॉरी, सर, मी आणि ओंकारने मूल दत्तक घ्यायचा निर्णय घेतला आहे. आमच्यासाठी रक्ताच्या नात्यापेक्षा भावनांचं नातं जास्त महत्वाचं आहे....एखाद्या अभागी अनाथ मुलाला किंवा मुलीला माझ्याइतकं आईचं प्रेम कोण देऊ शकेल? हे आम्ही कालच रात्री माईला सांगितलं आणि तेव्हाच तिने आमच्या नात्याला पूर्णपणे स्वीकारलं...

हर्षवर्धन: माई?


मालती आजी : होय हर्ष...ज्या कामासाठी मी आणि तुझ्या अण्णांनी आयुष्यभर प्रयत्न केले, ते काम माझ्या नावाकडून आणि नातसुनेकडून होताना बघणं यापेक्षा आनंदाची गोष्ट माझ्यासाठी तरी असू शकत नाही....माझा मुलगा आणि सून हे समजू शकत नाहीत याचं मला दुःख आहेच, पण त्यापेक्षाही मला आनंद आहे त्यांच्यापेक्षा वयाने लहान असूनही या दोघांचे विचार किती प्रगल्भ आहेत याचा.....ही माई या दोघांबरोबर आहे आणि राहील…. कोणालापटो ना पटो...

 

( हर्षवर्धन आणि मंजिरी रागाने तिथून आत निघून जातात. सारा आणि ओंकारच्या डोळ्यात पाणी येतं. ओंकार माईला बिलगून रडायला लागतो. )

मालती आजी : बाळा….. आता या घरात पाऊल ठेवशील, तर तुझ्या आई-बापाने तुम्हाला मानाने स्वीकारल्यावरच....आता तुम्ही दोघे या दाराच्या चौकटीबाहेर स्वतःचं विश्व निर्माण करा....तुमच्या आईबापाला आज जरी तुमची लाज वाटत असली, तरी उद्या त्यांना स्वतःचीच लाज वाटली पाहिजे असं आयुष्य जगून दाखवा....जा...या चौकटीबाहेर पाऊल ठेवा.... कोणत्याही चौकटीत बांधून ठेवता येणाऱ्या तुमच्या सच्या प्रेमाला माझे अनेक शुभाशीर्वाद आहेत. आयुष्य उपभोगण्यापेक्षा ते सार्थकी लावण्यातच तुमच्या नात्याची इतिकर्तव्यता आहे...आणि तुमच्या या आयुष्याचा मी एक भाग आहे, यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजते....आज खर्या अर्थाने अण्णा आणि मी भरून पावलो.... 

( मालती आजी ओंकार आणि साराला दाराकडे घेऊन जाते. दोघे बाहेर पडून बाहेरून चौकटीच्या आत उभ्या असलेल्या आजीच्या पाया पडतात आणि जातात. आजी पाठमोरी दोघांना हात हलवून निरोप देते )

पडदा पडतो.


Comments